उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात लग्न ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच लग्नाची वरात वधूच्या दारात पोहोचल्याची विचित्र घटना समोर आली आहे. ठरलेल्या दिवसाआधीच वरात दारात आल्याचं पाहून वधूच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. लग्नात पाहुण्यांसह नवरदेव आणि त्याच्या कुटुंबातील अनेक लोक उपस्थित होते. वरात आल्यावर वधूचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घाईघाईने सर्व व्यवस्था केली. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
हमीरपूरच्या सिकरोडी गावचे रहिवासी रामफळ अनुरागी यांची मुलगी रेखा हिचं लग्न कोतवाली येथील पारा पूरवा गावातील बेटारामसोबत ठरलं होतं. लग्नाची तारीख 27 फेब्रुवारी ठरवण्यात आली होती. पण लग्नाची वरात एक दिवस आधीच म्हणजेच 26 फेब्रुवारीला वधूच्या दारात पोहोचली. हे पाहून सगळेच हैराण झाले.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाची पत्रिका छापताना 27 ऐवजी 26 फेब्रुवारीची तारीख छापण्यात आली होती. त्यांच्या घरात फार कोणी शिकलेलं नव्हतं. त्यामुळे तारखेकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि नातेवाईकांमध्ये लग्नपत्रिकेचं वाटप करण्यात आलं होतं. 26 फेब्रुवारीला ते लग्नाची वरात घेऊन सिकरोडी गावात पोहोचले. तेथे गेल्यानंतर त्यांना कळलं की, लग्नाची तारीख 27 फेब्रुवारी ठरवण्यात आली होती.
एक दिवस आधीच दारात लग्नाची वरात पाहून मुलीचे कुटुंबीयही हैराण आणि अस्वस्थ झाले. मात्र, गावकऱ्यांच्या मदतीने सर्व व्यवस्था करून रितीरिवाजानुसार विवाह पार पडला. गावातील रहिवासी अशोक कुमार पांडे यांनी सांगितलं की, रेखाच्या वडिलांचं निधन झाले आहे. गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मदत केली. स्वागतासाठी रात्रभर जय्यत तयारी करण्यात आली. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.