नवी दिल्लीः समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बेनी प्रसाद वर्मा यांच्या मोठ्या मुलाचे मंगळवारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. बेनी प्रसाद वर्मा यांचा मुलगा दिनेश वर्मा यांच्यावर एस्कॉर्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. दिनेश वर्मा यांच्या निधनाने बेनी प्रसाद वर्मा कुटुंब व जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दिनेश वर्मा यांना किडनीच्या आजाराने ग्रासले होते. अलीकडेच कोरोना संसर्ग झाल्यावर त्यांना लखनऊच्या केजीएमयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथून ते बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. जेव्हा ते किडनीच्या नियमित तपासणीसाठी दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात पोहोचले, तेव्हा पुन्हा तपासणी केली गेली. त्यावेळी ते पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.मिळालेल्या माहितीनुसार, बेनीप्रसाद वर्मा यांचा मुलगा दिनेश वर्मा हे स्टोरेज कॉर्पोरेशनमध्ये काम करत होते. त्यांना मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्येनं ग्रासलं होतं, तसेच ते बराच काळ उपचार घेत होते. 2007मध्ये त्यांनी किडनी प्रत्यारोपणही केले. त्यांच्या आईने त्यांना एक मूत्रपिंड दान केले होते. ते आपल्या उपचारासाठी वेळोवेळी दिल्लीत जात असत. लखनऊमध्ये दिनेश वर्मा यांचा तपास अहवाल पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, तिथे उपचारानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. पण किडनीच्या आजारावर उपचार सुरू असल्यानं त्यांना दिल्ली एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल केले गेले. पण तिथे त्यांचा कोरोनाचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.वडील बेनी प्रसाद वर्मा यांचा लॉकडाऊनमध्ये मृत्यू विशेष म्हणजे लॉकडाऊनदरम्यान बेनी प्रसाद वर्मा यांचेही 27 मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. बेनी प्रसाद वर्मा हे समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि देशातील दिग्गज नेते होते. बेनी प्रसाद वर्मा हे समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते. बेनी प्रसाद वर्मा यांना उत्तर प्रदेशातील कुर्मी समुदायाचा सर्वात स्वीकारलेला नेता मानला जात असे. यूपीए 2 सरकारमध्ये बेनी प्रसाद वर्मा केंद्रीय पोलादमंत्री होते. ते सपाचे संस्थापक मुलायम सिंग यांचे निकटचे मानले जात होते.
CoronaVirus News: समाजवादीचे ज्येष्ठ दिवंगत नेते बेनी प्रसाद वर्मा यांच्या मुलाचा कोरोना संसर्गानं मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 3:12 PM