बारां- राजस्थानमधल्या बारां जिल्ह्यातील छबडा भागात बुधवारी एका नाल्यामध्ये 300हून अधिक बँक एटीएम कार्ड सापडली आहेत. या घटनेनंतर क्षेत्रीय ग्रामीण बँक प्रशासनात खळबळ उडाली. गावातल्या गरिबांना बँकेशी जोडण्यासाठी पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँक खाती उघडण्यात आली. ही कार्ड्स ग्रामीण भागातल्या गरिबांपर्यंत पोहोचवायची होती. 2016 रोजी जारी करण्यात आलेली ही कार्ड्स बँक खातेधारकांपर्यंत द्यायची होती. परंतु बँक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तसं होऊ शकलं नाही. जनधन योजनेंतर्गत खातं उघडल्यानंतर छबडातल्या बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँकेनं तीन वर्षं होऊन अद्याप एटीएम कार्ड पुरवली नव्हती. विशेष म्हणजे तीच कार्ड्स आता नाल्यात सापडली आहेत. एका वाटसरूनं जेव्हा बंद लिफाफ्यातील ही एटीएम कार्ड्स नाल्यात पडलेली पाहिली, तेव्हा लागलीच त्याची सूचना बँक अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर बँक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि नाल्यात पडलेली सर्व एटीएम कार्ड बँकेत घेऊन गेले.
धक्कादायक! जनधन योजनेचा बट्याबोळ; 300हून अधिक एटीएम कार्ड नाल्यात सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 3:13 PM