कन्नूर : मद्यपान करून वाहन चालवू नका, असे आवाहन नेहमीच केले जाते. ‘ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह’बद्दलच्या दंड व शिक्षेमध्येही वाढ करण्यात आली आहे. मद्यपान केले असेल, तर टॅक्सीने घरी जा, असेही पोलीस सांगतात; पण मद्यपान केलेल्या प्रवाशांना टॅक्सी वा रिक्षामध्ये बसवू नका, असे आदेश केरळ सरकारने काढल्याचे वृत्त आहे.मद्यपान केलेल्या प्रवाशांना गाडीत बसवू नका, असे टॅक्सी, ओला आणि उबरच्या चालकांना स्पष्टपणे सांगितले आहे. या नियमाचे उल्लंघन करताना पकडले गेल्यास चालकालाही शिक्षा होईल, असे आदेशात म्हटले आहे. रस्ते सुरक्षेसंदर्भात आपण अत्यंत गंभीर असल्याचा संदेश केरळ सरकारने या आदेशाद्वारे दिला आहे. मात्र, स्थानिकांचा या निर्णयाला विरोध आहे. रात्रपाळी करणारे ओला आणि उबरचे ड्रायव्हर मद्यपी मंडळींमुळे चांगली कमाई करतात. पब व बारच्या बाहेर ते गाड्या उभ्या करतात आणि मद्यपी प्रवाशांना त्यांच्या घरी घेऊन जातात. त्यातून त्यांना भरपूर पैसा मिळतो. आम्ही मद्यपान करीत नाही; पण ते करणाºयांना टॅक्सीत बसवणे हा गुन्हा कसा होऊ शकतो, असा चालकांचा सवाल आहे. (वृत्तसंस्था)
मद्यपी प्रवाशाला टॅक्सीत बसवणे हाही ठरेल गुन्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 4:19 AM