बरेली - दलित मुलाशी लग्न केलेल्या उत्तर प्रदेशातीलभाजपा आमदाराच्या मुलीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून वडिलांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा मुलीने केला आहे. उत्तर प्रदेशमधील आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने व्हिडीओच्या माध्यमातून जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन एका दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे वडिलांनी आपल्याला मारायला गुंड पाठवल्याचं तिने म्हटलं आहे.
साक्षी मिश्रा हिने घरच्या व्यक्तींपासून जीवाला धोका असल्याने पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. राजेश मिश्रा हे भाजपाचे आमदार आहेत. साक्षीने काही दिवसांपूर्वी पळून जाऊन अजितेश कुमार या दलित तरुणाशी लग्न केले होते. मात्र कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने त्यांनी तिला मारायला गुंड पाठवल्याच साक्षीने व्हिडीओत म्हटलं आहे. अजितेशच्या नातेवाईकांना देखील त्रास देत असल्याचं सांगितलं.
'पप्पा…तुम्ही राजीव राणाप्रमाणे माझ्यामागे गुंड पाठवलेत. आमचा जीव धोक्यात आहे. अभी आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देणं थांबवा. मला आनंदी राहायचं आहे, शांततेत जगू द्या. भविष्यात जर मला, अभी किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर यासाठी माझे वडील भाऊ आणि राजीव राणा जबाबदार असतील. जे माझ्या वडिलांना मदत करत आहेत, त्यांनी मदत करणं थांबवा' असंही साक्षीने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. आपल्या नातेवाईकांपासून जीवाला धोका असल्याने पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी साक्षीने केली आहे.
उच्चवर्णीय मुलीशी विवाह केल्यानं दलित तरुणाची निर्घृण हत्याएका क्षत्रिय राजपूत कुटुंबानं दलित तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना अहमदाबादपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंडल तालुक्यात घडली. दलित तरुणानं मुलीच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात लग्न केल्यानं संतापलेल्या कुटुंबानं टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण होत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं तिथून पळ काढला. आमच्या मुलीसोबत लग्न करण्याची हिंमत कशी केलीस, असा प्रश्न विचारत क्षत्रिय-राजपूत कुटुंबातील सदस्यांनी 23 वर्षीय हरेश सोळंकीची हत्या केली. लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन, सुरा भोसकून हरेशची हत्या केली गेली. लग्नामुळे झालेला वाद मिटवण्यासाठी हरेश त्याची पत्नी उर्मिलाच्या घरी गेला होता. सामंजस्यातून प्रकरण निवळावं यासाठी त्यानं राज्य सरकारनं स्थापन केलेल्या अभयम पथकाला फोन केला होता. त्यामुळे उर्मिलाच्या घरी जात असताना अभयम पथकातील पोलीस अधिकारी त्याच्यासोबत होती. मात्र हरेशला मारहाण केली जात असताना या अधिकारी महिलेनं घटनास्थळावरुन पळ काढला.