बाडमेरः राजस्थानच्या उत्तरलाई एअरबेसवरून उड्डाण घेतलेले मिग-२१ लढाऊ विमान काही किलोमीटर अंतरावर कोसळले. या अपघातात विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बल हे शदी झाले. मात्र, दोघांनीही विमानाला आग लागल्यानंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत प्रसंगावधान राखल्याने शेकडो जणांचे प्राण वाचले.
मोहित राणा आणि अद्वितीय बल यांनी गुरुवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी मिग-२१ बायसन या विमानातून उड्डाण केले होते. मात्र, काही मिनिटांमध्येच विमानाला आग लागली. त्यावेळी विमान एअरबेसपासून ४० किमीवर भीमडा गावाच्या वर होते. गावाची लोकसंख्या सुमारे २,५०० एवढी आहे. दोनच पर्याय होते. लगेच इजेक्ट करून विमान गावावर पडू द्यावे. मात्र, तसे केले असते तर शेकडो जणांचे प्राण धोक्यात आले असते. दुसरा म्हणजे स्वतःच्या प्राणांचा विचार न करता विमान दूर क्रॅश करावे. दुसरा पर्याय निवडत त्यांनी विमान गावापासून दोन किलोमीटरवर निर्मनुष्य परिसरात नेले. तिथे एका टेकडीवर विमान क्रॅश झाले.
लोकसंख्येचा अंदाज आला होताविंग कमांडर मोहित राणा हे मूळचे हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रहिवासी होते. तर अद्वितीय बल हे जम्मू येथील रहिवासी होते. विमानाला हवेतच आग लागल्यानंतर गावावरूनच दोन-तीन घिरट्या घातल्या. लोकांचा अंदाज आल्यामुळेच दोघांनी विमान उतरवण्यासाठी सुरक्षित जागा शोधली. क्रॅशनंतर अर्धा किलोमीटर परिसरात मलबा पसरला होता.
स्क्वाड्रन ५१ होणार निवृत्तभारतीय हवाई दल मिग-२१ बायसन विमानांचे स्क्वाड्रन ५१ सप्टेंबरअखेरीस निवृत्त करणार आहे. श्रीनगर एअरबेसवर हे स्क्वाड्रन तैनात आहे. २०१९च्या बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर स्क्वाड्रनला प्रसिद्धी मिळाली. या स्क्वाड्रनच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते.