मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या बारमेर येथील महिपाल सेजू या तरुणाचेही एका मोठ्या कंपनीत, मोठ्या पॅकेजवर काम करण्याचं स्वप्न होतं. कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बाडमेरच्या महिपाल सेजूची जपानमधील टोकियो येथील एका मोठ्या कंपनीत वार्षिक एक कोटी रुपयांच्या पॅकेजसाठी निवड झाली आहे.
महिपालच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच आता त्याचे नातेवाईक आणि आजूबाजूचे लोकही त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले आहेत. महिपाल हा बाडमेर शहरातील टिळकनगर येथील रहिवासी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण बारमेरमध्येच झाले. जोधपूरमधून दहावी पूर्ण केल्यानंतर त्याने कोटा येथे प्रवेश घेतला.
बारावीबरोबरच आयआयटीची तयारीही सुरू केली. महिपाल सेजू सांगतो की, त्याने दिल्लीतून चार वर्षे बीटेक केले. B.Tech दरम्यान, प्लेसमेंट एजन्सीने नागोया, जपानमधील एका कंपनीत नोकरीसाठी निवड केली, ज्याचे वार्षिक पॅकेज 30 लाख रुपये होते. त्यानंतर तो 2018 मध्ये जपानला गेला.
सुमारे 3 वर्षे काम केल्यानंतर, एप्रिल 2023 मध्ये टोकियोमधील मेकॅनिका कॉर्पोरेशन कंपनीमध्ये 1 कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली. तेव्हापासून टोकियो येथील कंपनीच्या मुख्यालयात सतत काम करत आहे. कंपनीत मुख्य काम हे आयटी सल्लागाराचं आहे. कंपनीच्या युरोप, हाँगकाँग, मलेशिया आणि सिंगापूर येथेही शाखा आहेत. महिपाल सेजूचे वडील गेमराराम हे वनविभागात कार्यरत असून ते आता निवृत्त झाले आहेत. आई कमला देवी निरक्षर आहेत. महिपाल चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे.