जयपूर: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Women's Day) एक सुखद बातमी आहे. पाकिस्तानातून दोन नवऱ्या मुली आज सीमा ओलांडून राजस्थानात प्रवेश करतील. त्यामुळे महिला दिनी दोन दाम्पत्यांचा दुरावा संपेल. गेल्या दोन वर्षांत भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडल्याचा फटका दोन जोडप्यांना बसला. मात्र आता परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या दोन मुली आज खऱ्या अर्थानं भारताच्या सुना होतील. त्या भारताच्या जमिनीवर पाऊल ठेवतील.जसलमेरच्या बईया गावचे रहिवासी असलेल्या नेपाल सिंह आणि बाडमेरच्या गिराब क्षेत्रातल्या महेंद्र सिंह यांनी पाकिस्तानातल्या अमरकोट आणि सिणोईमधील मुलींशी २०१९ मध्ये विवाह केला. नेपाल सिंह आणि महेंद्र सिंह यांचं वऱ्हाड थार एक्स्प्रेसनं पाकिस्तानला गेलं. मात्र त्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध बिघडले. त्यामुळे व्हिसा मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. नेपाल आणि महेंद्र यांच्या पत्नींना भारतात येता आलं नाही.आता दोन्ही देशांचे संबंध काहीसे सुधारले आहेत. त्यामुळे दोघांच्या पत्नी आज वाघा बॉर्डर ओलांडून भारतात पाऊल ठेवतील. त्यांच्या स्वागतासाठी नेपाल सिंह आणि महेंद्र सिंह यांचे कुटुंबीय सीमेवर पोहोचले आहेत. थोड्याच वेळात महेंद्र सिंह यांची पत्नी छगनी, नेपाल सिंह यांची पत्नी कैलाश आणि त्यांची सासू मोर कंवर भारतात येतील.सीमावर्ती जिल्ह्यांचं रोटी-बेटीचं नातंराजस्थानमधील बाडमेर-जसलमेर जिल्ह्याचे शेजारील पाकिस्तानशी रोटी-बेटीचं नातं आहे. इथल्या अनेक कुटुंबांचं पाकिस्तानशी नातं आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर करण्यात आलेला एअर स्ट्राईक यामुळे दोन्ही देशातला तणाव वाढला. याचा फटका नेपाल सिंह आणि महेंद्र सिंह यांच्या कुटुंबांना बसला. थार एक्स्प्रेस बंद करण्यात आली. त्यामुळे सीमेपलीकडून होत असलेलं येणं-जाणं बंद झालं.
'त्या' दोघींना महिला दिनाची भेट; २ वर्षांचा विरह संपणार, पाकिस्तानच्या लेकी भारताच्या सुना होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 2:14 PM