Odisha Tragedy : ओडिशात २ जून रोजी झालेला रेल्वेअपघात म्हणजे एक वाईट स्वप्नच. या भीषण अपघाताने अनेकांना पोरकं केलं, काहींनी आपले नातेवाईक गमावले, कोण अनाथ झाला तर कोणाच्या डोक्यावरचं 'बाप' नावाचं छत्र हरपलं. २९० जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी अनेकजण समोर येत आहेत. पण हा भीषण अपघात झालाच कसा? हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. लक्षणीय बाब म्हणजे आजतागायत काही कुटुंबीयांना या अपघातात जीव गमावलेल्या आपल्या नातेवाईकाचा मृतदेह मिळालेला नाही.
दरम्यान, बिहारची रहिवासी असलेल्या बसंती देवी आजही आपल्या पतीच्या मृतदेहाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी २ जूनच्या बालासोर रेल्वे दुर्घटनेत आपला पती गमावला. पण त्यांना अद्याप पतीचे पार्थिव मिळालेले नाही. त्या त्यांच्या पतीच्या मृतदेहाविषयी माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. भुवनेश्वरमधील रेल्वेने प्रदान केलेल्या एका लॉजमध्ये त्या अधिकाऱ्यांकडे आशेने पाहत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील वडिलांना शेवटचे भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
२९० जण दगावले२ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २९० जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.