Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणी अमित शाह यांची भेट घेतली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाहांशी चर्चा केल्याचे सांगितले. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आडमुठेपणा कायम ठेवत, कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच या प्रकरणी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावाद सोडवण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली, याबाबत पत्रकारांनी बोम्मईंना प्रश्न विचारला. मात्र, या प्रश्नावर संतप्त होत, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, याप्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही. अमित शाहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही, असे बोम्मईंनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितले आहे
जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात असलेल्या कन्नडिगांचे संरक्षण करण्याबाबत सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती बोम्मई यांनी यावेळी दिली.
दरम्यान, अमित शाहांशी फोनवरून चर्चा करून, सर्व परिस्थिती मांडली. विनाकारण महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला होणे, योग्य नाही, हे लक्षात आणून दिले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो, त्यांनी मला आश्वासित केले आहे की, हल्ले होणार नाही. गृहमंत्र्यांना विनंती केली आहे, की त्यांनीही यामध्ये लक्ष घालावे आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावे की अशाप्रकारे दोन्ही राज्यांमध्ये एकमेकांच्या वाहनांवर हल्ले होणे अतिशय चुकीचे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"