बंगळुरु- कर्नाटक सरकारमधील ओढाताण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा नव्या विषयावर आपली नाराजी कळवली आहे. सरकारच्या विविध निर्णयांवर सिद्धरामय्या यांनी अनेकदा नापसंती व्यक्त केली आहे.
फिल्म सिटीचा प्रकल्प रामनगर येथे स्थापन केला जाऊ नये असे सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींना पत्र लिहिले आहे. सिद्धरामय्या यांनी गेल्या दोन महिन्यात मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पाचवे पत्र आहे. सिद्धरामय्या गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही होते. गेल्या सरकारचे शेवटचे बजेट सादर करताना त्यांनी म्हैसुर येथे फिल्मसिटी स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र सध्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी हा निर्णय बदलून फिल्म सिटी रामनगर येथे नेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दलच सिद्धरामय्या यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. कुमारस्वामींनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
कन्नड अभिनेता राजकुमार याने फिल्म सिटी म्हैसुरमध्ये असणे हिताचे असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांचाही उल्लेख सिद्धरामय्या यांनी पत्रात केला आहे. म्हैसुरमध्ये फिल्मसिटीचे काम सुरु झाले असून कन्नड चित्रपटसृष्टीच्या हिताच्या दृष्टीने कुमारस्वामींनी निर्णय घ्यावा असे सिद्धरामय्या यांनी पत्रात नमूद केले आहे.कुमारस्वामी यांच्या जेडी (एस) काँग्रेस आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यापासून सिद्धारामय्या यांनी कुमारस्वामी आणि त्यांच्या मंत्र्यांना समस्यांचा पाढा वाचणारी पत्रे पाठवण्याचा धडाका लावला आहे. यापैकी बहुतांश पत्रांमध्ये सिद्धारामय्या यांनी त्यांच्या बदामी या मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला आहे. तसेच खनिज तेलावरील कर वाढवण्याच्या तसेच पीडीएस-बीपीएल कुटुंबीयांसाठी देण्यात येणाऱ्या तांदळाच्या पुरवठ्यात घट करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी सिद्धारामय्या यांनी केली आहे.
सिद्धारामय्या यांच्या या पत्रांमुळे कुमारस्वामी चांगलेच त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आघाडी सरकार चालवतानाच्या अडचणींचा पाढा वाचला होता. दरम्यान, कुमारस्वामी यांना डिवचण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी सिद्धारामय्या हा पत्रप्रपंच करत असल्याचे मत राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.