आज शक्तिपरीक्षण : बिहारची अनिश्चितता शिगेलापाटणा : शुक्रवारी विधानसभेत होणाऱ्या शक्तिपरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आणि अनिश्चितता शिगेला पोहोचली. जेमतेम डझनभर आमदार आणि मंत्र्यांचा पाठिंबा असलेल्या मुख्यमंत्री मांझी यांना तारण्यासाठी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय ८७ आमदार असलेल्या भाजपाने रात्री जाहीर केला. दुसरीकडे आमच्याकडेच बहुमत आहे, असा दावा करणाऱ्या नितिश कुमार यांच्या संयुक्त जनता दलास, त्यांच्याच विनंतीनुसार, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली.चार समर्थक आमदारांना विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यास पाटणा उच्च न्यायालयाने मनाई केल्याने मांझी यांचे गणित तेवढ्याने घाट्याचे झाले. हे आमदार गळल्याने विधानसभेत मतदान करू शकणाऱ्या आमदारांची संख्या २२९ झाली आहे. खुर्ची टिकविण्यासाठी मांझी यांना किमान ११५ आमदारांचा पाठिंबा लागेल. भाजपाचे ८७ जमेस धरता त्यांची गोळाबेरीज जेमतेम शंभरच्या घरात पोहोचली आहे. १५-२० आमदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी रात्रभरात काय होईल, हे सांगणे कठीण आहे. (वृत्तसंस्था)माझ्याकडेही मंत्रिपदे रिकामी...मांझींना पाठिंबा देण्याचे मत बिहार भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बुधवारच्या बैठकीत एकमुखाने व्यक्त केले गेले होते. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानेही यास हिरवा कंदील दाखविला. स्वत: मांझी यांनी पाटण्यात एका कार्यक्रमात बोलताना आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी जनतेनेच त्यांच्यावर दबाव आणावा असे आवाहन केले. मंत्री होण्यासाठी हे आमदार ‘त्यांच्या’बरोबर जात असतील तर माझ्याकडेही बरीच मंत्रिपदे रिकामी आहेत, असे त्यांनी जाहीर केले.एकच पक्ष (संजद) सत्तापक्षात आणि विरोधात बसण्याचा हा देशातील बहुधा पहिलाच प्रसंग आहे. मांझी यांना मुद्द्यांवर आधारित समर्थन देण्याचे भाजपाने ठरविले आहे. परंतु याचा अर्थ पक्ष मांझी सरकारमध्ये सहभागी होणार असा होत नाही.- नंदकिशोर यादव, भाजपा नेतेसंयुक्त जनता दलाला नियमांनुसार मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. सभागृहाचे कामकाज हे नियम आणि कायद्यानुसार चालत असते, कोणा एकाच्या मर्जीने नाही.- उदय नारायण चौधरी, विधानसभा अध्यक्ष