नवी दिल्ली : एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे गेल्या १२-१५ वर्षांत भारतात किमान दोन कोटी ‘नकुशा’ मुली जन्माला आल्या असाव्यात, असा अंदाज सरकारच्या अधिकृत आकडेवारीत व्यक्त झाला आहे. या मुली कुटुंबातील अपेक्षित अपत्यांहून जास्तीच्या संख्येत मोडत असल्याने मुलांच्या तुलनेत त्यांच्याकडे अधिक दुर्लक्ष होण्याची शक्यताही आहे.सन २०१७-१८ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या सातव्या प्रकरणात अशा ‘नकुशा’ मुलींची सैद्धांतिक गणना प्रथमच झाली असून त्यांची संख्या सुमारे दोन कोटी एक लाख असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वेक्षण म्हणते की, कुटुंबात निदान एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे मुलगा होईपर्यंत अपत्ये होऊ दिली जातात. मुलगा होईल या अपेक्षेने घेतलेल्या संधीच्या वेळी झालेल्या मुली ‘नकोशा’ वर्गात मोडतात. त्यामुळे आज मुलींचा जन्मदर पूर्वीपेक्षा वाढलेला दिसत असला तरी त्यातील काही भाग‘नकोशा’ मुलींचा आहे.सर्वेक्षण म्हणते...1970 पासून भारताने लोकसंख्येतील लैंगिक गुणोत्तराचे संतुलन राखण्यात १७ पैकी १० निकषांवर समाधानकारक प्रगती केली असली तरी मुलींपेक्षा मुलांचा अजूनही काहीसा जास्त असलेला जन्मदर ही चिंतेची बाब आहे.1994मध्ये गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायदा केल्यापासून स्त्रीभ्रुणहत्येचे प्रमाण कमी. तरीही समाजात ‘मुलगा हवा’ ही मानसिकता कायम आहे.‘हवीशी’ आणि ‘नकोशी’ अशा दोन गटांत वर्गवारीअमर्त्य सेन व इतर अर्थतज्ज्ञांनी मुलगा व मुलगी यांच्या जन्मदराच्या व्यस्त गुणोत्तराचा अभ्यास करून वास्तवात ज्या स्त्रिया जन्माला यायला हव्या वा हयात असायला हव्या होत्या, पण त्या नाहीत अशा ‘गायब स्त्रियां’चा (मिसिंग विमेन) आकडा चार कोटी अंदाजित केला होता.नंतरच्या तीन दशकांत जन्मदरातील मुलींचे गुणोत्तर सुधारले. मुलींची ‘हवीशी’ आणि ‘नकोशी’ असा दोन वर्गांत वर्गवारी करण्याचा उपक्रम या वर्षीच्या अहवालात प्रथमच हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जयचंद्रन आणि पांडे या अर्थतज्ज्ञाच्या ताज्या अभ्यासाचा आधार घेण्यात आला आहे.अपत्य जन्मात मुलीपेक्षा मुलाला पसंती देण्याचा पगडा ही आहे. यासाठी एरवी वापरण्यात येणारे जन्माच्या वेळचे लैंगिक गुणोत्तर न वापरता कुटुंबातील शेवटच्या अपत्याचे लैंगिक गुणोत्तर हे सूत्र वापरण्यात आले. यावरून केलेल्या विश्लेषणातून दिसते की, साधारणपणे विवाहित दाम्पत्य दोन अपत्यानंतर संततीस पूर्णविराम देत असली तरी, ही ही पहिली दोन अपत्ये मुलगा आहे की मुलगी यावरही संततीविराम अवलंबून असतो.
मुलांच्या हव्यासापोटी ‘नकुशीं’ची संख्या दोन कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 5:55 AM