Bastar Encounter :छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या परिसरात चकमक सुरू असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रे-दारुगोळा जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर माड भागात नक्षलवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून नारायणपूर पोलिस आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी चकमक झाली आणि त्यात 24 नक्षलवादी ठार झाले. दंतेवाडाचे एसपी गौरव राय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
त्यांनी सांगितले की, दुपारी एकच्या सुमारास सुरक्षा दल नक्षलवाद्यांच्या ठिकाणावर पोहोचताच त्यांनी (नक्षलवाद्यांनी) गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा तळही उद्ध्वस्त केला आहे.
आतापर्यंत 181 नक्षलवादी ठार छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दल सातत्याने कारवाई करत आहेत. ज्या नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे, त्यांनाही विशेष ऑपरेशन अंतर्गत परत येण्याची संधी दिली जात आहे. एवढे प्रयत्न करूनही जे नक्षलवादाचा मार्ग सोडत नाहीत, त्यांचा खात्मा केला जात आहे. विशेष म्हणजे, दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर प्रदेशात आतापर्यंत सुरक्षा दलांनी 181 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. वेगवेगळ्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
अमित शाहांचा नक्षलवादावर प्रहारविशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑगस्ट महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना नक्षलवादाचा नायनाट करण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. भारत मार्च 2026 पर्यंत डाव्यांच्या कट्टरवादापासून मुक्त होईल. या धोक्याविरुद्ध अखेरची लढाई सुरू करण्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे, असे शाह म्हणाले होते. एवढेच नाही, तर त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचार सोडण्याचे आवाहनही केले.