लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नक्षलवाद्यांच्या कारवायांनी सर्वाधिक प्रभावित असलेल्या छत्तीसगढच्या बस्तर भागात नक्षलींचा मुकाबला करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल स्थानिक आदिवासी युवकांची खास ‘बस्तरिया बटालियन’ उभी करत आहे.केंद्रीय गृह मंत्रालाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेथे नक्षलींचा प्रभाव सर्वाधिक आहे अशा सुकमा, दातेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर या जिल्ह्यांमधून या बटालियनसाठी ७४३ आदिवासी तरुणांची जवान म्हणून भरती करण्यात आली आहे. यात २४२ महिला आहेत.फक्त स्थानिक आदिवासींची भरती करण्याच्या अटीवरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने अशी बस्तरिया बटालियन उभारण्यास मंजुरी दिली होती. सुरक्षा दलांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग वाढविण्यासोबत रोजगार उपलब्ध करून देणे या दुहेरी उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर किमान पाच वर्षांसाठी ही बटालियन फक्त बस्तरमध्येच तैनात केली जाईल.
आदिवासी मुला-मुलींची ‘बस्तरिया’ बटालियन
By admin | Published: June 09, 2017 3:46 AM