चंडीगड : पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी तळावर बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता. या चार जवानांच्या हत्येची जबाबदारी सीख फॉर जस्टिस (एसएफजे) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. गुरपटवंतसिंग पन्नू हा एसएफजेचा प्रमुख आहे. छावणी परिसरात राहणाऱ्या व्यक्तीनेच गोळीबार केला असावा अशी शक्यता सैन्य व पोलिसांच्या तपास पथकाने व्यक्त केली आहे. पहाटे साडेचार वाजता गोळीबार झाला होता. तीन दिवस उलटून गेले तरी हल्लेखोरांचा शोध सुरूच आहे. भटिंडा छावणी परिसरात राहणारे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांची मोजणी केली जात आहे. जेणेकरून, हे समजू शकेल की, या घटनेनंतर कोणी जवान बेपत्ता तर नाही.
जवान झोपेत असताना गोळीबारहल्लेखोर दोघे होते, असे तपासादरम्यान समोर आले आहे. एकाच्या हातात रिव्हॉल्व्हर तर दुसऱ्याच्या हातात कुऱ्हाड होती. जवान गाढ झोपेत असताना त्यांना गोळ्या मारण्यात आल्या. भटिंडा छावणी पोलिसांनी याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध खून आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या इन्सास रायफलमधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, ती काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. या रायफलचा फॉरेन्सिक अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
तपास सुरूलष्कराच्या अधिकाऱ्यांना असे वाटत आहे की, परस्पर वैरातून ही घटना घडली असावी. त्यादृष्टीने तपासही केला जात आहे. शहीद जवानांच्या शरीरावर कोणत्याही धारदार शस्त्राच्या, जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत.