दिल्ली पोलिसांनी बुधवारी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिज खान उर्फ जुनैदला अटक केल्यानंतर आता बाटला हाऊस चकमकीवरून नवा राजकीय वाद पेटला आहे. २००८ मध्ये दिल्लीत झालेल्या बाटला हाऊसमधील चकमकीनंतर आरिज खान पसार झाला होता. मात्र, आता या चकमकीच्या जुन्या संदर्भांचा दाखला देत राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरूवात केली आहे. आरिज खानला अटक झाल्यामुळे बाटला हाऊस एन्काऊंटरनंतर मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे, अशी टीका भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी केली. तर काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी बाटला हाऊस चकमकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखाद्या गुन्हेगाराला अटक करणे, हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. गुन्हेगाराला अटक केल्यानंतर त्याच्यावर लगेचच आरोपपत्र दाखल करणेही गरजेचे असते. आरिज खानलाही बाटला हाऊस चकमकीच्यावेळी अटक होणे गरजेचे होते. मात्र, तसे होऊ शकले नाही. याविषयी पोलिसांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. मात्र, आता त्याला अटक झाली आहे तर या सगळ्याचा खुलासा होणे गरजेचे असल्याची मागणी सलमान खुर्शिद यांनी केली. या चकमकीनंतर राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून अनेक आरोप झाल्याचे दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी सांगितले. मात्र, आरिजच्या अटकेमुळे हे आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध झाल्याचे नीरज कुमार यांनी म्हटले. मात्र, बाटला हाऊसमधील रहिवाशांकडून आरिज खानच्या अटकेविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे. 2008 मधील चकमक संशयास्पद होती. त्यानंतर काल आरिज खानला करण्यात आलेली अटकही, संशयास्पद वाटते. एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला जरुर अटक करावी. मात्र, एखाद्या निष्पाप व्यक्तीला चुकीच्या गुन्ह्यात गोवले जाऊ नये, एवढेच आम्हाला वाटते, अशी प्रतिक्रया येथील एका रहिवाशाने दिली.
सप्टेंबर २००८ मध्ये दिल्लीतील बाटला हाऊस येथील चकमकीत आरिज खान हा पळून जाण्यात जाण्यात यशस्वी ठरला होता. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. तर दोघांना पोलिसांनी अटक केली होती. पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा या चकमकीत शहीद झाले होते. आरिज उर्फ जुनैद हा २००८ पासून भारतातील गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता. त्याचा पाच बॉम्बस्फोटांमध्ये हात असल्याची माहिती पोलिसांकडे होती. अखेर दिल्ली पोलिसांनी भारत – नेपाळ सीमेवरुन त्याला अटक केली आहे.