नवी दिल्ली : दिल्लीमध्ये १२ वर्षांपूर्वी झालेल्या बाटला हाउस चकमकीदरम्यान पाेलीस निरीक्षक माेहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी आरिझ खान (Ariz Khan) याला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने ८ मार्च राेजी या प्रकरणी आरिझ खानला आर्म्स ॲक्ट आणि कलम ३०२, ३०७ अंतर्गत दोषी ठरविले हाेते. त्यावर शिक्षेचा निर्णय राखून ठेवला हाेता.
दिल्लीतील साखळी बाॅम्बस्फाेटांच्या घटनेनंतर जामियानगर परिसरात बाटला हाउसमध्ये सप्टेंबर २००८ मध्ये दिल्ली पाेलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली हाेती. त्या वेळी विशेष पथकात तैनात असलेले माेहनचंद शर्मा यांचा मृत्यू झाला हाेता. पाेलीस कर्मचारी बलवंत सिंह राजवीर यांनाही आरिझने ठार मारण्याचा प्रयत्न केला हाेता. या घटनेनंतर आरिझने घटनास्थळावरून पळ काढला हाेता. त्याला २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणाशी संबंधित इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी शहजाद अहमद याला २०१३ मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली हाेती.
न्यायाचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याचा खूनआरिझला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना, हे केवळ खुनाचे प्रकरण नाही, तर न्यायाचे रक्षण करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या खुनाची घटना असल्याचे पाेलिसांनी म्हटले हाेते, तर आरिझ खानच्या वकिलांनी फाशीच्या शिक्षेस विरोध केला.