राजकोट : भाजपचा गड असलेल्या राजकोटमधील दक्षिण व ग्रामीण हे दोन्ही मतदारसंघ कायम राखण्यासाठी भाजपने दोन्ही ठिकाणी आपल्या आमदारांचे तिकीट कापत उमेदवार बदलले आहेत. लेउवा पाटीदार समाजाचे प्राबल्य असलेल्या दक्षिण राजकोटमध्ये भाजप, काँग्रेस व आम आदमी पार्टी या तीनही पक्षांनी लेहुआ पाटीदार समाजाचेच उमेदार दिल्याने समाजातील मतदार संभ्रमात आहेत. त्यामुळे समाजाच्या कार्डपेक्षा पक्षाची ताकदच निकाल लावेल.
२२ वर्षांपासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. येथे विजयाची हॅट्रिक मारणारे आमदार गोविंदभाई पटेल यांचे तिकीट कापत रमेश टिलाला या बड्या उद्योगपतीला पुढे केले. यावेळी काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष हितेश वोरा यांना ‘हात’ दिला आहे.
चुनाव में हिरा ही चुनेंगे… -दक्षिण राजकोट हे जगभरात नकली दागिने निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. हे आशियातील सर्वांत मोठे दागिने निर्मितीचे केंद्र मानले जाते. या इंडस्ट्रीची उलाढाल कोट्यवधींची आहे. मात्र, नकली दागिन्यांचा व्यापार करणारे येथील व्यापारी ‘चुनाव में हिरा ही चुनेंगे…’ असे ठासून म्हणत बरेच काही सांगून जातात.
भाजपची चलाख खेळी -१९ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा गेल्या वेळी भाजपचे आमदार लाखाभाई सागठिया यांनी २१०० मतांनी जिंकली. यावेळी भाजपच्या सर्वेक्षणात ही जागा गमावण्याचा धोका दिसून आला. त्यामुळे त्यांचा पत्ता कट करीत विद्यमान नगरसेविका भानुबेन बाबरिया यांना मैदानात उतरविले आहे.