कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणुकांमुळे राजकारण तापले असून, मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रविवारी जनतेसह विरोधकांना ‘सरप्राईज’ दिले. प्रचार करताना जखमी झालेल्या ममतांनी ‘व्हीलचेअर’वर बसून चक्क ‘रोड शो’ केला. पाच किलोमीटरच्या या ‘रोड शो’मध्ये सहभागी होण्याअगोदर ‘मी अजूनही वेदना सहन करते आहे’, असे ‘ट्विट’ करत समर्थकांना भावनिक सादच घातली. दरम्यान, नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्यावर कुठलाही हल्ला झाला नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. (The battle in West Bengal; There is no attack on Mamata, the Election Commission said)
नंदीग्राम येथे प्रचारादरम्यान ६६ वर्षीय ममता बॅनर्जी जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या पायाला ‘प्लास्टर’ बांधण्यात आले व त्या दवाखान्यात दाखल होत्या. शुक्रवारीच त्यांची रुग्णालयातून सुटी झाली होती. अशा स्थितीत रविवारी त्यांचा ‘रोड शो’ होणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र ‘मी अजूनही वेदनेत आहे, मात्र माझ्या लोकांसाठी मला जास्त वेदना होत आहेत’ असे ‘ट्विट’ करत ममता ‘रोड शो’मध्ये सहभागी झाल्या. गांधी पुतळा ते हाजरा दरम्यान झालेल्या या ‘रोड शो’मध्ये ममता पूर्णवेळ ‘व्हीलचेअर’वर बसल्या होत्या. निवडणूक आयाेगाने नाेंदविलेला निष्कर्ष तृणमूल काॅंग्रेसने फेटाळला आहे. हल्ल्याची उच्चस्तरीय चाैकशी करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
सुरक्षा संचालक, एसपी सस्पेंडममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा ठपका ठेवल्यानंतर निवडणूक आयाेगाने सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना निलंबित केले आहे. तसेच पूर्व मिदनापूर जिल्ह्याचे पाेलीस अधीक्षक प्रवीण प्रकाश यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी विभू गाेयल यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे.
‘खेला होबे’चा नारा, राज्यभर दौरा - जखमी वाघ आणखी आक्रमक होतो. मी आजवर अनेक हल्ल्यांचा सामना केला, मात्र कुणासमोर झुकले नाही. लोकशाहीवर हल्ल्यासारखी कोणतीही मोठी वेदना नाही. मला आयुष्यात अनेकदा ठेच लागली आहे, जखमा झाल्या आहेत. मात्र, बंगालच्या जनतेच्या वेदनेपेक्षा माझी वेदना मोठी नाही.
- माझ्या पायाला जखम झाली असली तरी मी राज्यभर दौरा करणार, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी परत एकदा ‘खेला होबे’ची घोषणा दिली. तर समर्थक ‘भंगा पाये, खेला होबे’चा (जखमी पायाने खेळणार) असा नारा देत होते.
सुरक्षा प्रभारींच्या चुकीमुळे जखमी- ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याच्या शक्यतेचे निवडणूक आयोगाने खंडन केले आहे. आयोगाचे दोन विशेष निवडणूक पर्यवेक्षक व राज्य शासनाच्या अहवालाच्या समीक्षेनंतर निवडणूक आयोगाने ही भूमिका मांडली आहे. - बॅनर्जी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या चुकीमुळे त्या जखमी झाल्याचे आयोगाने म्हटले आहे. स्टार प्रचारक व मुख्यमंत्री असूनदेखील ममता या बुलेटप्रुफ वाहनाचा उपयोग करत नव्हत्या. ही त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांची चूक आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.