मुंबई : विमानतळांवर दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यतेने नागरी हवाई वाहतुकीची सुरक्षा सांभाळणाऱ्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी (बीसीएएस)ने मुंबईसह देशभरातील विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.१० ते २० ऑगस्ट या कालावधीत विमानतळावर आगंतुकांना प्रवेश दिला जाऊ नये, असे निर्देश दिले आहेत. १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा निर्णय घेण्यात आला.दहशतवाद विरोधी पथक, जलद कृती दलांनी सर्व विमानतळांवर कार्यरत करावे, निरीक्षण वाढवावे, विमानतळाकडे जाणाºया नाक्यांवर वाहनांची व नागरिकांची तपासणी करावी, कार्गो टर्मिनलवरील सुरक्षेत वाढ करावी, सशस्त्र जवानांनी यावर लक्ष ठेवावे, विमानतळाच्या इमारतीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक तैनात ठेवावे अशा विविध सूचना बीसीएएसच्या उपसंचालक सी. के. रंगा यांनी दिल्या आहेत.विमानतळावरील सुरक्षेसोबत कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्यावी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी, बीसीएएसचे विभागीय संचालक यांनी परिस्थितीचा व्यक्तिश: आढावा घ्यावा व सुरक्षाव्यवस्था अधिक कठोर करावी, असे निर्देश बीसीएएसच्या संचालकांकडून देण्यात आले आहेत. विमानतळांसोबत एअरस्ट्रिप, फ्लाईंग स्कूल, हवाई वाहतूक प्रशिक्षण केंद्रांवरील सुरक्षादेखील वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
देशभरातील विमानतळांना बीसीएएसचा अतिदक्षतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 3:52 AM