मुंबई, दि. 20 - भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीची भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने प्रतिष्ठेच्या पद्मभूषण किताबासाठी शिफारस केली आहे. देशातल्या तिस-या क्रमांकाच्या नागरी सन्मानासाठी म्हणजेच पद्मभूषण सन्मानासाठी बीसीसीआयने केवळ धोनीचेच नाव सुचवले असून त्याच्या नावावर एकमताने निर्णय झाल्याचे समजते. भारतीय क्रिकेट आणि कर्णधारपदावरील यशस्वी कारकिर्द याचा विचार करुन त्याचे नाव पद्मभूषण सन्मानासाठी सुचवल्याचे सांगितले.
बीसीसीआयच्या एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, "महेंद्र सिंग धोनीच्या खेळातील योगदानाबाबत सदस्यांच्या मनात कोणतीच शंका नव्हती. दोन जागतिक किताब ( त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दित २००७ टी २० विश्वचषक आणि २०११ विश्वचषक भारताने जिंकले), जवळजवळ १० हजार धावा, ९० कसोटी सामने. त्याच्यापेक्षा सरस नाव सुचवण्यासारखे नव्हते."
३६ वर्षांच्या धोनीने ३०२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९७३७ धावा तर ९० कसोटी सामन्यांमध्ये ४८७६ धावा केल्या आहेत तसेच टी २०चे ७८ आंतरराष्ट्रीय सामने खेळून त्यात १२१२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १६ शतके आणि १०० अर्धशतके जमा आहेत . यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावताना त्याने ५८४ झेल घेतले असून १६३ वेळा फलंदाजांना यष्टीचित केले आहे.
धोनीला यापुर्वी राजीव गांधी खेलरत्न, पद्मश्री आणि अर्जुन हे पुरस्कार मिळालेले आहेत. जर धोनीला हा पुरस्कार मिळाला तर तो पद्मभूषण मिळवणारा ११ वा क्रिकेटपटू होईल. यापुर्वी हा सन्मान कपिल देव, सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, प्रा. डी. बी. देवधर, सी.के. नायडू आणि लाला अमरनाथ यांनाही मिळालेला आहे. १३ फर्स्ट क्लास सामने खेळणारे पतियाळाचे राजे भलिंद्रसिंह आणि १९३६ साली इंग्लंड दौ-यावेळी भारताच्या संघाचे कर्णधार असणारे महाराजा आँफ विजयानगरम विजयआनंद यांनाही हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.