पुणे : क्षयरोगापासून प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी, यासाठी भारतात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या बीसीजी लशीमुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी असल्याचा समज पसरला आहे. मात्र, हा व्हायरस नवीन आहे. त्यावर बीसीजी लशीचा कोणता परिणाम होतो, याबाबत माहिती नाही. त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवता लोकांनी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवावे असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
चीनमधून सुरू झालेला ‘कोव्हिड -१९’ हा रोग जगभर पसरला; मात्र प्रत्येक देशामध्ये प्रसाराच्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. इटलीमध्ये कोरोनाच्या उद्रेकानंतर अत्यंत कडक संचारबंदी लागू करूनही मृतांची संख्या जास्त आहे. जपानमध्ये कमी संचारबंदी लागू करूनही रुग्णांचा आणि मृतांचा आकडा मर्यादित राहिला. प्रत्येक देशात असणारी आरोग्यव्यवस्था आणि सामाजिक फरकांमुळे आजाराचा प्रभाव प्रत्येक देशावर वेगळा होत असतो. न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथील वैज्ञानिकांच्या मते, क्षयरोगाच्या लसीकरणातले फरक हेही कारण असू शकते.डॉ. गोंझालो ओटाझू यांच्या निरीक्षणानुसार, बीसीजी लस देण्यात येणाºया देशांत ‘कोव्हिड-१९’चा मृत्यूदर कमी आहे. इटली, उत्तर अमेरिकेत बीसीजी लस कधीही सक्तीने दिली गेली नाही. तेथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. इराणमध्ये १९८४ नंतर बीसीजी लशीची सक्ती केली गेली. याचाच अर्थ ३६ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना बीसीजीचे संरक्षण नाही. म्हणून कोरोनाचा फटका इराणला जास्त जाणवला असल्याची शक्यता आहे.भारतात १९४८ पासून सर्व नवजात बालकांना क्षयरोगापासून प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी बीसीजी लस दिली जाते. ‘कोव्हिड-१९’ आणि क्षयरोग या दोन्ही आजारांमध्ये श्वसनप्रक्रियेवर प्रामुख्याने परिणाम होतात. बीसीजी लस पांढºया पेशींमार्फत श्वसनसंस्थेतील प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे श्वसनसंस्थेला संसर्ग करणाºया जिवाणू आणि विषाणूंना प्रतिकार निर्माण होतो.कोरोना विषाणू हा नवा असल्याने बीसीजी लशीमुळे त्यावर विशिष्ट प्रतिकार निर्माण होईल की नाही, हे संशोधनाशिवाय सांगणे कठीण आहे. त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी करत आहेत.‘सार्स’वर बीसीजी ठरली होती कुचकामी‘सार्स’च्या विषाणूवर बीसीजी लशीमुळे विशिष्ट प्रतिकार निर्माण झाला नव्हता. बीसीजी लशीमुळे शरीरात निर्माण झालेला श्वसनविकाराचा प्रतिकार हा दीर्घकाळ टिकेलच, असेही नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार : बीसीजी लशीमुळे निर्माण झालेला प्रतिकार १० ते २० वर्षे कार्यरत राहतो; तसेच पुन्हा लसीकरण केल्यावर त्याची उपयुक्तता किती असेल, यावर जास्त माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे सध्याच्या ‘कोव्हिड-१९’ च्या साथीवर बीसीजी हा रामबाण ठरेल, असे विस्तृत संशोधनाशिवाय म्हणणे चुकीचे ठरेल.क्षयरोग होऊ नये म्हणून नवजात अभ्रकास बीसीजी लस दिली जाते. जन्मल्यानंतर, लगेच अथवा जन्मानंतर तीन आठवड्यांच्या आत ही लस दिली जाते. गेल्या दहा वर्षांच्या संशोधनामध्ये या लशीमुळे क्षयरोगापासून बचाव होत नसल्याचे दिसून आले आहे. केवळ लहान मुलांना होणाºया मेंदूच्या क्षयरोगापासून बचाव होतो. कोरोना व्हायरसविरोधात कोणत्या जुन्या लस प्रभावी ठरतात, यावर संशोधन सुरू आहे. नवीन लसही शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बीसीजीमुळे कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते, असे संशोधनातून अजून सिद्ध झालेले नाही. केवळ, त्याचा परिणाम काय होतो हे तपासण्यात येत आहे.- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र