नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील भोजीपुरा विधानसभेतील सपा आमदार शहजील इस्लाम यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा देणं आता चांगलंच महागात पडलं आहे. काही दिवसांपूर्वी सपा कार्यालयात एका सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला होता की, भाषण करणार, तर गोळ्या झाडू, याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहजील इस्लामविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच जिल्हा उपाध्यक्ष संजीव सक्सेना देखील यावेळी सोबत होते. गुरुवारी बरेली विकास प्राधिकरणाने त्याच्यावर कारवाई करत त्याच्या पेट्रोल पंपावर थेट बुलडोझर फिरवला आहे.
शहजील इस्लाम (SP MLA Shahzil Islam) यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी आराखडा पास न करताच पेट्रोल पंप तयार केला. त्यानंतर बरेली विकास प्राधिकरणाने कारवाई करत सीबीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रामपूर रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर बुलडोझरच चालवला नाही तर तो सीलही केला. एवढेच नाही तर प्राधिकरणाच्या पथकाने पंपावर बसविण्यात आलेले सीएनजी गॅस आणि पेट्रोल मशीनही जप्त केले आहेत. विकास प्राधिकरणाकडून कोणत्याही आराखड्याची मंजुरी न घेता आपला पेट्रोलपंप बांधण्यात आल्याचा आरोप आमदारावर आहे.
कंपाउंडिंगसाठी अनेकवेळा नोटिसा पाठविण्यात आल्या, मात्र पंप मालकाकडून मंजुरी घेण्यात आली नाही. त्यानंतर आज प्राधिकरणाच्या पथकाने बुलडोझर चालवून पंप उद्ध्वस्त केला. विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता राजीव दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी शहजील इस्लाम यांना नोटीस बजावण्यात आली होती. 2021 मध्ये पंप पाडण्याचे आदेश देण्यात आले होते, तरीही त्यांच्याकडून आराखड्याला मंजुरी घेण्यात आली नाही.
सपा आमदारावर सरकारी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या आरोपांनंतर आज पंप जमीनदोस्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शहजील इस्लाम यांनी सीएम योगी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर हिंदू युवा वाहिनीच्या एका नेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सपा नेते संजीव सक्सेना आणि सपा आमदार शहजील इस्लाम यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.