नवी दिल्ली - कॅनडातील काही भागांमध्ये भारतविरोधी कारवाया सुरू आहेत. ते लक्षात घेऊन भारतीयांनीकॅनडामध्ये प्रवास करताना सावधानता बाळगावी, त्या देशात शिकायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनीही सतर्क राहावे, अशा सूचना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना दिल्या आहेत.
खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रु्डो यांनी केला. तसेच भारतीय राजदूताला कॅनडातून निघून जाण्याचा आदेश दिला. ट्रुडो यांनी केलेला आरोप भारताने फेटाळला, तसेच कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांचीही भारतातून हकालपट्टी करण्यात आली.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतविरोधी कारवायांना विरोध करणाऱ्या लोकांवर कॅनडामध्ये हल्ले होण्याचे प्रकार काही भागांत घडले आहेत. त्यामुळे त्या परिसरात प्रवास करणे भारतीयांनी टाळावे.
लष्करी सहकार्यावर परिणाम होणार नाहीअमेरिका, भारतामध्ये काही मुद्द्यांवरून तणाव निर्माण झाला असला तरी त्याचा दोन्ही देशांच्या लष्करी सहकार्यावर काहीही परिणाम होणार नाही असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. हिंद-पॅसिफिक क्षेत्रातील लष्करप्रमुखांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या परिषदेत कॅनडाचे लष्कर सहभागी होणार आहे, असे त्या देशातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताबाबत कॅनडाने केलेला दावा चिंताजनकहरदीपसिंग निज्जर याच्या हत्येसंदर्भात कॅनडाने भारताबाबत केलेला दावा चिंताजनक आहे. आम्ही यासंदर्भातील स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत, तसेच या गोष्टींसंदर्भात भारताशी चर्चाही करणार आहोत असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. ब्रिटन, अमेरिकेनेही आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया ट्रुडो यांच्या आरोपानंतर व्यक्त केली होती.