नवी दिल्ली : कोरोना संसगार्मुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशात होणाऱ्या अपराधांची संख्या कमी झाली असताना या काळात लोकांचे इंटरनेटवर विसंबून राहणे आणि त्याचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांमध्ये मात्र वेगाने वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये (एनसीआर) सायबर गुन्हे २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत.
लॉकडाउनच्या काळात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत दिल्लीत १ हजार ३४५ सायबर गुन्हे नोंदले गेले आहेत. मागील वर्षी याच काळात ८५९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यावर्षी नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये बहुतांश प्रकरणे बँक खात्यांमधील देवाण-घेवाण, बनावट ई-कॉमर्स वेबसाइट बनवून केलेली फसवणूक, खातेधारकाच्या संमतीविना त्याच्या बँक खात्यातून पैसे काढणे अशा स्वरुपाची आहेत. तसेच यात हॅकिंग आणि सोशल मीडियाशी संबंधित प्रकरणे आहेत ज्यात महिला आणि तरुणींना लक्ष्य करण्यात आले.आॅनलाईन खरेदीचे आमिषयातील अनेक प्रकरणांमध्ये लोकांना लॉकडाऊनमुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या बहाण्याने बनावट ई-कॉमर्स वेबसाईट तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू तसेच खाद्यपदार्थ खरेदी करण्याचे आमिष दाखवले आहे.त्यात खरेदी नोंदविताना आॅनलाईन पेमेंट घेण्यात आले आहे परंतु सामान घरी न पोहचल्याने चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. काही प्रकरणांत अपराध्यांनी बँक कर्मचारी म्हणून फोन करून लोकांच्या खात्याची माहिती मिळवून त्यांंना गंडा घातला आहे.