या गावांमध्ये सिगारेट ओढाल तर खबरदार...! घरांना आग लागण्यासारखे प्रकार टाळण्यासाठी उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:51 AM2023-01-31T05:51:44+5:302023-01-31T06:27:12+5:30
उत्तराखंड येथील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे कित्येक घरे व इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे धोकादायक अवस्थेतील काही घरे पाडावी लागली.
डेहराडून : उत्तराखंड येथील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे कित्येक घरे व इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे धोकादायक अवस्थेतील काही घरे पाडावी लागली. मात्र, या राज्यात गंगाड, ओसला यासारख्या पाच गावांमध्ये संपूर्ण लाकडी घरे असून, भूकंपाचा धक्का बसला तरी त्यांचे मोठे नुकसान होत नाही. पर्यायाने जीवितहानीदेखील टळते. मात्र, या गावांमध्ये रहिवाशांना धूम्रपानावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे घरांना आग लागण्यासारखे प्रकार सहज टाळता येतात.
लाकडांनी बांधलेल्या घरांच्या वास्तुशैलीला ‘कोटी बनाल’ असे म्हणतात. ही घरे देवदार वृक्षांच्या लाकडांनी बांधण्यात येतात. भूकंपाचा मोठा धक्का बसला तरी या घरांचे फार नुकसान होत नाही. त्यामुळे वित्त व जीवितहानीचे प्रमाणही खूप कमी होते. लाकूडकाम असल्याने या घरांचे आगीपासून संरक्षण करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या गावातील रहिवाशांनी धूम्रपान करण्यावर तेथील ग्रामपंचायतींनी बंदी घातली आहे. सिगारेट ओढल्यास दंड आकारण्यात येतो. (वृत्तसंस्था)
प्राचीन कोटी बनाल वास्तुशैली
लाकडाचा वापर करून घरे बांधण्याची ‘कोटी बनाल’ वास्तुशैली काही हजार वर्षे जुनी असल्याचे गंगाड, ओसला आदी पाच गावांतील जाणकार सांगतात. ही घरे तीन ते चार मजल्यांची असतात. त्यातील तळमजला गुरांचा गोठा म्हणून वापरण्यात येतो. पहिल्या मजल्यावर बकऱ्या ठेवण्यात येतात. दुसऱ्या मजल्यावर त्या घरातील सदस्य राहतात. तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर धान्यसाठा व इतर सामान ठेवलेले असते.
१९९१च्या भूकंपात लाकडी घरांचे झाले नाही नुकसान
उत्तराखंडमध्ये १९९१ साली भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. मात्र त्यात गंगाड, ओसलासह पाच गावांतील लाकडी घरांचे फारसे नुकसान झाले नाही. देवदार वृक्षाचे लाकूड पाऊसपाणी, वारा, बर्फ आदींचा मारा सहन करत सुमारे ९०० वर्षे टिकते असे मानले जाते. तसेच या लाकडाने बांधलेली घरे भूंकपरोधकही असल्याने त्यात राहाणारे लोकही सुरक्षित असतात.