ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - इंडिगोचं विमान लॅडिंग करण्याच्या तयारीत असतानाच सामानाच्या कप्प्यात ठेवलेल्या सॅमसंग नोट 2 ने पेट घेतला असल्याची घटना समोर आली आहे. इंडिगोच्या सिंगापूर - चेन्नई विमानात ही घटना घडली. सॅमसंग नोट 2 ने पेट घेतल्यानंतर कप्प्यातून येणा-या धुरामुळे हा प्रकार प्रवाशांचा लक्षात आला आणि त्यांनी त्वरित विमानातील क्रू मेम्बर्सला यासंबंधी माहिती दिली. वेळीस घटना लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. नागरी विमान उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) सर्व प्रवाशांना सॅमसंग नोट डिव्हाईस वापरत असल्यास काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
'सॅमसंग नोट डिव्हाईस सोबत घेऊन प्रवास करत असाल तर काळजी घेण्याचा सल्ला आम्ही दिला आहे. त्यांनी हे डिव्हाईस स्विच ऑफ ठेवावेत अथवा प्रवासात सोबत ठेऊ नयेत,' असं डीजीसीएच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.
इंडिगोने यासंबंधी निवेदन जारी केलं आहे. सिंगापूर - चेन्नई 6E-054 विमानात काही प्रवाशांनी सामानाच्या कप्प्यातून धूर येताना पाहिलं आणि लगेच केबिन क्रूला कळवलं. क्रूने तात्काळ परिस्थितीचं गांभीर्य ओळखत वैनामिकाला यासंबंधी माहिती दिली. वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला विमानातील परिस्थितीबद्दल कळवलं. केबिन क्रूने अग्निरोधकाचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवलं.
चेन्नई विमानतळावर विमानाचं सुरक्षित लॅडिंग झालं असून सर्व प्रवासी सुखरुप आहेत. जळालेल्या सॅमसंग फोनची तपासणी करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आला आहे.