ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - सोशल नेटवर्किंग साइट्समुळे दुरावलेली माणसं एकामेकांशी जोडली गेली, जुने मित्र पुन्हा भेटले असे अनेक फायदे झाले. मात्र याच सोशल नेटवर्किंग साईटसचे तोटेही आहे. दिवसदिवस या साईट्सवर वेळ घालवणा-यांना समोरच्या माणसाशी आपुलकीचे चार शब्द बोलायला वेळ नाही. या साईट्सवर आपले फोटो, फ्रेंड्सबरोबरचे प्लॅन सगळं शेअर केल्याने खासगी आयुष्य काहीच उरलं नाही आणि त्याचाच फायदा घेऊन अनेक समाजकंटक तुमच्याशी मैत्री करून लुबाडण्याचा, फसवण्याचाही प्रयत्न करत असतात. यामुळे अनेक लोकांची आयुष्य उध्वस्त झाली असून पोलिसही नागरिकांना फेसबूक, ट्विटर आदींच्या आहारी न जाण्याचा सल्ला देत असतात.
हे सगळं आत्ता सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून फेसबूकवर मधू शहा या महिलेच्या अकाऊंटने धूम मचवली आहे. मधू शहा या महिलेच्या नावाने २७ हून अधिक अकाऊंट्स असून ती अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या मधू शहाच्या नावाने ही अकाऊंट आणि रिक्वेस्ट्स पाठवल्या जात आहेत, ती मुळात अस्तित्वातच नाहीये.. काही समाजकंटक तिच्या नावाने फेक अकाऊंट्स बनवून लोकांशी मैत्री करून त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच हा प्रकार उघडकीस आला असून आता हे फेक अकाऊंट बंद करण्यासाठी सोशल मीडियावर मोहिम सुरु झाली आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या महिलेच्या नावाने सुरु झालेल्या अकाऊंटविरोधात आवाज उठवला आहे आणि आपल्या मित्रांना सुरक्षिततेचे सल्ले देत आहेत.
काय आहे नेमके हे प्रकरण ?
> फेसबुकवर मधू शहा नावाने एक-दोन नाही तर ३० च्या आसपास अकाऊंट्स आहेत.
> त्या अकाऊंटमधील महिलेचे नाव व प्रोफाईल फोटो सेम आहे, मात्र तिचे लोकेशन वेगवेगळ्या शहरांचे आहे.
> ही सर्व अकाऊंट्स फेक असून तो एक स्पॅम असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही समाजकंटक या अकाऊंट्सच्या माध्यमातून जगभरातील लोकांशी मैत्री करून जोडत आहेत व त्यांची खासगी माहिती चोरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
> हा अकाऊंट्सचा खोटेपणा लक्षात येताच आता नागरिकांनी ती फेक अकाऊंट बंद करण्याची मोहिम उघडली असून हजारो युझर्स त्यात सहभागी झाले आहेत.
> फेसबुक यूजर्स आपल्या मित्रांना कॉमेंट् बॉक्समध्ये टॅक करुन या मोहिमेत जोडत आहेत. मधू शहाच्या फ्रेंडलिस्टमध्ये चेक करुन या फेक अकाऊंटला अनफ्रेंड करण्याचा सल्ला देत आहेत.