ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेकांनी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जमा केल्या होत्या. जर तुम्हीही नोटाबंदीदरम्यान आपल्या बँक खात्यात जुन्या नोटा जमा केल्या असतील तर ही बातमी जाणून घेणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांमधून काळा पैसा खणून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.
नोटाबंदीच्या संशयास्पद व्यवहार करणाऱ्यांना नोटिसा पाठवण्यासाठी सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. त्यामुळे लोकांना प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तसेच प्राप्तिकर विभागाकडूनही कागदोपत्री नोटिसा पाठवण्यात येणार नाहीत. 1 फेब्रुवारीपासून बेहिशोबी रक्कम जमा करणाऱ्यांना प्ताप्तिकर विभागाकडून ईमेल आणि एसएमएस येऊ लागतील. मात्र ही प्रक्रिया सुरू असताना सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात ज्यांनी बँकांमध्ये पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे, तसेच ज्यांच्या करपरताव्याचे गेल्या काही वर्षातील आकडे आणि नोटाबंदीनंतर त्यांनी जमा केलेली रक्कम यांच्यात तफावत आहे. अशा लोकांना संदेश पाठवले जातील. आकडेवारीनुसार अशा लोकांची संख्या 18 लाख एवढी आहे.
नोटाबंदीनंतर सुमारे 18 लाख खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम ही संबंधिक खातेदारांच्या करपरताव्यांशी जुळत नसल्याचे समोर आल्याची माहिती वित्तसचिव हसमुख अढिया यांनी दिली आहे.