नवी दिल्ली- भारतीय निवडणूक आयोग आणि सर्व मतदारांना राष्ट्रीय मतदाता दिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो, असं वक्तव्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. देशातील प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहून संविधानाचा आदर करत मतदान करावे व मतदानासाठी इतरांनाही प्रेरित करावे. एखाद्याच्या भूमिकेशी असहमत असतानाही उदारमतवादी राहावे, असंही कोविंद म्हणाले आहेत. देशाच्या 69 प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राष्ट्रपतींनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या सर्व शहिदांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. लोकशाहीच्या मूल्यांना मी नमन करतो. भारताचे नागरिक हे फक्त प्रजासत्ताक दिनाचे निर्माते नव्हे, तर आधारस्तंभ आहेत. प्रत्येक नागरिक लोकशाहीला ताकद देतो. देशातील प्रत्येक डॉक्टर, शेतकरी, पोलीस, जवान, नर्स, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, शास्त्रज्ञ, अभियंता, ज्येष्ठ नागरिक, तरुण, लहान मुलं भारत देश घडवण्यासाठी नवनवी स्वप्ने पाहत आहेत, असंही कोविंद म्हणाले आहेत. भारताला स्वातंत्र्य हे कठीण संघर्षानंतर मिळालं आहे. या संग्रामात लाखो लोकांनी सहभाग घेतला होता. त्या जवानांनी देशासाठी स्वतः सर्वस्व अर्पण केलं आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हे जवान देशासाठी झगडत राहिले. संविधान बनवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. संविधान बनवणा-यांना दूरदर्शी विचार केला होता. त्यामुळे आपल्याला प्रजासत्ताक दिन वारशात मिळाला आहे. राष्ट्र निर्माणासाठी छोट्या छोट्या अभियानांना जोडलं गेलं आहे. देशातील समाजात चांगल्या संस्कारांची पायाभरणी करणं आणि समाजातील अंधश्रद्धा, असमानता मिटवणं हेसुद्धा राष्ट्र निर्माणातील महत्त्वाचं कार्य आहे.देशात मुलींनाही मुलांसारखी शिक्षा, स्वास्थ्य आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. समाजानं आमच्या मुलींचा आवाज ऐकला पाहिजे, परिवर्तनाच्या या हाकेला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. देशातील 60 टक्क्यांहून अधिक नागरिक हे 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यांच्यावर भारताचं भवितव्य निर्भर आहे. देशातील साक्षरतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता शिक्षणाला आणखी चालना देण्याची गरज आहे. 21व्या शतकातल्या डिजिटल अर्थव्यवस्था, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन यांसारख्या आव्हानांना समर्थपणे पेलण्याची गरज आहे. देशातील खाद्यान्न उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. परंतु अद्यापही कुपोषण दूर झालेलं नाही. प्रत्येक मुलांच्या ताटात आवश्यक पोषक तत्त्व उपलब्ध करून देण्याचं सरकारपुढे आव्हान आहे. आम्ही आमच्या शेजारील देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. अनुशासन आणि नैतिक संस्थांमुळेच एक सदृढ राष्ट्र निर्माण होतं.भारताच्या राष्ट्र निर्माणाच्या अभियानाचा जगातील प्रगतीत योगदान देणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. 2020 रोजी देशाच्या प्रजासत्ताक दिनाला 70 वर्षं पूर्ण होतील, तर 2022मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्तानं आनंद साजरा केला जाईल. मागासवर्गीयांना देशाच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरात बरोबरीत आणणं हेच लोकशाहीच्या यशाचं गमक आहे. गरिबीच्या अभिशापाला कमी करण्याची गरज आहे. भारताला विकसित देश बनवणं हे आपलं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढे जातो आहोत, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.
एखाद्याच्या भूमिकेशी असहमत असतानाही उदारमतवादी राहावे- रामनाथ कोविंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 8:30 PM