ECI Advisory to Rahul Gandhi (Marathi News) : नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने भविष्यात होणाऱ्या जाहीर सभांदरम्यान आपल्या वक्तव्यांबाबत अधिक सतर्क आणि सावध राहण्यास सांगितले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा नेत्यांच्या विरोधात भाषण करताना पाकीटमार आणि पनौती असे शब्द वापरले होते. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयाने निवडणूक आयोगाला यावर कारवाई करण्यास सांगितले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पनौती आणि पाकीटमार शब्द वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीसही पाठवली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना १ मार्च रोजी नोटीस पाठवली असून प्रचारादरम्यान विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. दरम्यान, राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतेही वक्तव्य करताना विचारपूर्वक करावे, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
रिपोर्टमध्ये सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या २१ डिसेंबर २०२३ च्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आणि यावरील राहुल गांधींचे उत्तर लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि भविष्यात संबोधित करताना सावध राहण्यास सांगितले आहे. तसेच निवडणूक आयोगाने राहुल गांधींना त्यांच्या पक्षाच्या सर्व स्टार प्रचारक आणि उमेदवारांना या मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्यास सांगितले आहे.