सकाळपासून सुरू होणारा चिमण्यांचा किलबिलाट, त्यांच्या किलबिलाटानं येणारी जाग आणि अंगणात बागडण्याच्या त्यांच्या सवयीमुळे आपल्याही घरात येणारं चैतन्य... चिमण्यांचा आणि आपला घरोबा, त्यांच्याशी असलेली आपली दोस्ती किती जुनी आहे, माहीत आहे? किमान दहा हजार वर्षे जुनी!
चिमण्यांनी आपलं अंगण कधीच सोडलं नाही, माणसाबरोबरच्या आपल्या दोस्तीलाही त्या कायम जागल्या, पण माणूसच कृतघ्न निघाला. जाणतेपणी आणि अजाणतेपणीही आपल्या अंगणातलं चिमण्यांचं खोपटं त्यानं मोडून काढलं. मध्यंतरीच्या काळात तर चिमण्या जणू अस्तंगतच झाल्या होत्या. अनेक कारणं होती. माणसानं विकासाच्या नावाखाली लक्षावधी झाडं तोडली, प्रदुषण वाढलं, शेतात रासायनिक खतांचा मारा सुरू झाला, उंचच उंच इमारती बांधल्या जाताना माणसानं त्यांच्यासाठी एखादा कोपराही सोडला नाही. आपलं ऐश्वर्य मिरवताना माणसानं अनेक इमारतींना तर काचाच लावल्या. या पारदर्शक काचांचा अडथळा लक्षात न आल्यानं त्यावर डोकं आपटूनही अनेक चिमण्यांचा अंत झाला.
चिमण्या दिसेनाशा होत गेल्या. इतक्या की ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या जगप्रसिद्ध संस्थेलाही 2002 मध्ये चिमण्यांना अस्तंगत होत जाणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत टाकावं लागलं. कारण त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. चिमण्यांच्या घटत जाणाऱ्या संख्येमुळे 2007 साली दिल्लीत एक अभ्यासगटही नेमण्यात आला. पण चिमणीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आता आली आहे. चिमण्यांची संख्या पूर्वीइतकी जरी नाही, तरी आता बऱ्यापैकी वाढली आहे, वाढते आहे.
अर्थात याला कारणही चिमण्यांचे जुने दोस्त, म्हणजे माणूसच आहे. चिमण्यांची संख्या वाढावी म्हणून अनेक पक्षीप्रेमींनी त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी कृत्रिम घरटी बांधण्यापासून तर पाणी, अन्न आणि अंगणात ती पुन्हा बागडावीत यासाठी मनापासून प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना आता यश येऊ लागलंय. गेली काही दशके एकदमच गायब झालेल्या चिमण्या आता हळूहळू पुन्हा दिसायला लागल्यात.
शहरी भागातली त्यांची संख्याही वाढतेय. यामुळेच ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’नं (आययूसीएन) आपल्या नव्या यादीत चिमण्यांना ‘लिस्ट कन्सर्न’ म्हणजे कमीत कमी चिंता असलेल्या पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट केलंय. विकासाच्या मागे धावत असताना आपल्या या जुन्या मैत्रिणीची माणसाला पुन्हा एकदा आठवण झाली आहे. चिमण्या आणि माणसांचा हा जुना याराना आता यापुढेही कायम वाढत राहील आणि आपल्या अंगणात त्या कायम चिवचिवत राहतील यासाठी आपला दोस्तीचा हात मात्र आपण कायमच पुढे ठेवायला हवा.