नितीन अग्रवाल नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेसह सर्व संघटनांनी संयम राखावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे.
निर्णय मंदिराच्या बाजूने आला तरी कोणत्याही प्रकारे विजयोत्सव वा मिरवणूक काढून जल्लोष करू नये, असा सल्लाही संघाने दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच्या संभाव्य स्थितीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आयोजित बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, दत्तात्रय होसबोले यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि विश्व हिंदू परिषदेच्या गाभा समितीचे सदस्य उपस्थित होते. या आधीही संघाने सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचे आवाहन केले होते.महाराष्ट्र, हरयाणा निवडणुकीवर चर्चा...सूत्रांनुसार महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या संघाच्या पहिल्या समन्वय समितीत सर्व मित्र संघटनांनी निवडणुकीच्या निकालावर आपापले अहवाल संघाकडे सुपूर्द केले. संघाची ही बैठक पहिल्यांदा हरिद्वारमध्ये होणार होती. ती रद्द करून ही बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली.