नवी दिल्ली : दिल्लीतील जवळपास 2 लाख 93 हजार रेशन कार्ड रद्द केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी करायच्या आधीच अधिका-यांनी कार्यालयात बसून रेशन कार्ड रद्द केली. याकडे अन्न नागरी पुरवठा विभागाकडून सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत असल्याची टीकाही अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, लाल किल्यावरुन मोदीजींनी सांगितले की, 6 कोटी बनावट रेशन कार्ड रद्द केली. मात्र, मोदींच्या खोट्या दाव्याचे सत्य वाचा. पीएमओ दिल्लीच्या अधिका-यांना फोन करुन जबरदस्तीने कार्ड रद्द करण्यासाठी सांगतात. मोदीजी तुम्ही देश सांभाळा. देश सांभाळत नाही. दिल्लीत लक्ष देणे बंद करा किंवा पंतप्रधान पद सोडून दिल्लीतील मुख्यमंत्री व्हा.