नवी दिल्ली - भाजपा खासदारांचा दोन दिवसीय अभ्यास वर्ग रविवारी दिल्लीत सुरु झाला. या अभ्यास वर्गात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन केलं. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरु करा. काहीतरी असं काम करा ज्यामुळे तुमच्या कामाच्या बळावर तुम्ही निवडून याल. मोदीच्या नावावर जिंकू असा विचार करु नका. तुम्हाला जिंकून देणं ही माझी जबाबदारी नाही. स्वत:चं काम असं करा ते लोकचं तुम्हाला निवडून देतील असं पंतप्रधानांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत म्हणाले की, कोणत्याही विजयात सर्वांचा वाटा असतो त्यामुळे मी स्वत:च्या जीवावर निवडून आलो आहे असं अभिर्भाव आणू नका. कार्यकर्ते आणि लोकांकडे दुर्लक्ष करु नका. काही बोलाल ते विचार करुन बोला. तुम्ही बोलण्यापासून ते वागण्यापर्यंत प्रत्येक गोष्टींवर लोकांचे लक्ष असते.
तसेच जर तुम्ही एअरपोर्टवर गेला आणि प्रोटोकॉलमुळे तुम्हाला लाइनमध्ये उभं राहता येत नाही. लोकं यावर बोलत नसली तरी त्यांच्या मनाला ते पटत नसतं. जर तुम्ही लाइनमध्ये उभं राहिला तर त्याने काय फरक पडतो. फ्लाइट तर दिलेल्या वेळेतच जाणार आहे. जर तुम्ही लाइनमध्ये उभं राहत असाल आणि एकेदिवशी तुम्ही लाइन न लावत निघून गेला तर लोकचं बोलतील काहीतरी महत्वाचं काम असल्याने गेले असतील असं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिले.
खासदारांनी त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करावं. लोकं त्यांच्या समस्या घेऊन येत असतात मागणी करत असतात पण जे तुम्ही पूर्ण करु शकाल अशीच आश्वासने लोकांना द्या. जी तुम्हाला करणं शक्य होणार नाही ते लोकांना समजवून सांगा. ज्यांनी तुम्हाला मतं दिली नाहीत अशा लोकांच्या विरोधात नकारात्मक विचार आणू नका. या लोकांची मनं जिंकण्यासाठी काम करा. तुमचं काम आणि वागणं बघून हे लोकं तुमच्या जवळ येतील असा विश्वास नरेंद्र मोदींनी खासदारांना दिला.
पक्ष, मतदारसंघ याचबरोबर कुटुंब आणि आरोग्य याकडेही खासदारांनी लक्ष द्यावं. पक्षाचं काम करता करता आपण कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो. मुलांकडे लक्ष द्या असा कौटुंबिक सल्लाही मोदींनी खासदारांना दिला.