नवी दिल्ली : उत्तर भारतातील हिमाचल, काश्मीर आणि उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. यंदाही देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विशेषत: उत्तर भारतात दिल्लीसह उष्ण राहणाऱ्या अन्य क्षेत्रांत पारा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. गेल्या वर्षी २५ एप्रिल रोजी दिल्लीत १२२ वर्षांचा विक्रम मोडत तापमान ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. यावेळीही तापमानाचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे.
साधारणपणे १० फेब्रुवारीनंतर तापमान वाढण्यास सुरुवात होते, परंतु यावेळी दिल्लीसह मध्य, पूर्व व पश्चिम भारतात कमाल आणि किमान तापमान आधीच वाढू लागले आहे. गुरुवारी दिल्लीत २७ अंश सेल्सिअस, रायपूरमध्ये ३१ अंश सेल्सिअस व भोपाळमध्ये २९.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
उन्हाळा लवकर - पश्चिमी हवामान बदल (वेस्टर्न डिस्टर्बन्स) सक्रिय होणे हे याचे एक कारण असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये तापमानात झालेली वाढ, यावेळी उन्हाळा लवकर येणार असल्याचे सूचित करते. - मध्य प्रदेशात १८ फेब्रुवारीपासून पारा झपाट्याने वाढेल. गेल्या वर्षी २२ फेब्रुवारीपासून कमाल तापमानात वाढ झाली होती.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमवृष्टीहिमाचल-काश्मीरमध्ये गुरुवारी झालेली बर्फवृष्टीही वेस्टर्न डिस्टर्बन्सचाच परिणाम आहे. काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये गुरुवारी हिमवृष्टी सुरू झाली. हिमाचलच्या कुल्लू आणि लाहौल स्पितीसह अटल बोगद्याच्या दक्षिण व उत्तर टोकांमध्ये ५ इंच बर्फ पडला. काश्मीरच्या गुलमर्ग व वरच्या भागात बर्फवृष्टी झाली, तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब, जोशीमठच्या उंच शिखरांवर बर्फवृष्टी झाली. हिमवृष्टी दोन दिवस सुरू राहू शकते.