भोपाळ - मध्य प्रदेशमधीलकाँग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया यांचं एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. यामध्ये ते कथितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येबाबत बोलताना दिसत आहेत. मात्र नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा पुढच्या निवडणुकीत मोदींना पराभूत करा असा होता. एवढंच नाही तर ते उदगार हे बोलण्याच्या ओघात निघून गेले, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, या व्हिडीओवरून भाजपा नेते आक्रमक झाले आहेत.
राजा पटेरिया यांचा जो कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ते काही कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. ते सांगतात की, मोदी निवडणुका संपुष्टात आणतील. मोदी धर्म, जात, भाषा यांच्या आधारावर फूट पाडतील. दलित आणि आदिवासींचं आणि अल्पसंख्याकांचं जीवन संकटात आहे. जर संविधानाचं रक्षण करायचं असेल तर मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा. मात्र नंतर त्यांनी या विधानावर सारवासारव केली. तसेच हत्येचा अर्थ पराभव असा सांगितला.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजा पटेरिया म्हणाले की, माझ्या बोलण्याचा अर्थ हा पुढच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करा असा होता. बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. मात्र ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. त्याने केवळ हाच भाग उचलला आणि व्हिडीओ व्हायरल केला. माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. माझं विधान मोडतोड करून दाखवलं गेलं.
पटेरिया यांच्या विधानावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पटेरिया यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे. त्यावरून हे स्पष्ट होते की, ही महात्मा गांधींची काँग्रेस नाही. ही इटलीची काँग्रेस आहे आणि इटलीची मानसिकता मुसोलिनीची आहे. मी या प्रकरणात त्वरित एफआरआयर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.