New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं. नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर विरोधक सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान या वास्तूचं उद्धघाटन करणार म्हणून विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. देशभरातील विविध राजकीय पक्षाचे नेते आपापली मतं मांडत आहेत. विरोधक लोकशाहीचा दाखला देत मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत, तर सत्ताधारी भाजप हा ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हणत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने 'अभिमान बाळगा, राजकारण नाही' अशी प्रतिक्रिया या दिली आहे. तसेच प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे त्यानं म्हटले आहे.
राज्यासह देशभरातील विरोधकांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून मोदी सरकारवर टीका केली. यावर व्यक्त होताना सोनू सूदने एक सूचक विधान केल्याचे दिसते. "अभिमान बाळगा, राजकारण नाही. आज प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. जय हिंद", अशा आशयाचं ट्विट करत अभिनेत्यानं विरोधकांना फटकारलं.
शरद पवारांची टीका"सकाळी कार्यक्रम पाहिला. पण मला आनंद आहे की मी तिथे गेलो नाही. तिथे जे काही घडले ते पाहून मला काळजी वाटते. आपण देशाला मागे नेत आहोत का? हा कार्यक्रम फक्त मर्यादित लोकांसाठीच होता का?", अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.
१४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचं प्रतिबिंब - मोदी नव्या वास्तूचं उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित केले. भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. संसद भवन परिसरात सर्वधर्मीय प्रार्थना झाल्या. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. नवी संसद हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. नवी संसद हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारे मंदिर आहे. नवीन संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारा दुवा सिद्ध होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत, आपल्या देशाचा आणि तेथील लोकांचा विकास ही आपली प्रेरणा आहे. नवीन संसदेच्या उभारणीचा आपल्याला जसा अभिमान वाटतो, तसेच गेल्या ९ वर्षांत देशात ४ कोटी गरीब लोकांसाठी घरे आणि ११ कोटी शौचालये बांधल्याचा विचार करताना मला खूप समाधान मिळते. भारत ही लोकशाहीची जननी आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हे आपले संस्कार, कल्पना आणि परंपरा आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.