ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25- फेसबुकवर असणाऱ्या एका प्रोफाईलपासून आपल्या सगळ्यांनाच सावध राहाण्याची गरज आहे. मोहम्मद अली अब्दलवहाब ( Mohamed Ali Abdelwahab) नावाची फेसबुक प्रोफाईल आपोआप तुमच्या फ्रेण्डलिस्टमध्ये घुसली असण्याची शक्यता आहे. मोहम्मद अली अब्दलवहाब या नावाच्या प्रोफाईलवरून तुम्हाला फ्रेण्ड रिक्वेस्ट आली नाही तरीही ती व्यक्ती तुमच्या फेसबुक अकाऊंटमध्ये सामिल होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. तशी अनेक उदाहरणंही सध्या फेसबुकवर बघायला मिळत आहेत. म्हणूनच जर ही व्यक्ती तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये आढळली तर लगेचच ती प्रोफाईल ब्लॉक करा, असा सल्ला दिला जात आहे. पण जर त्या प्रोफाईलला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला तर ती प्रोफाईल ब्लॉक होत नसल्याचं समजतं आहे. या प्रोफाईल विषयी माहिती देणारा मेसेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे.
आणखी वाचा
मोहम्मद अली अब्दलवहाब या नावाची प्रोफाईल आपोआप तुमच्या लिस्टमध्ये अॅड होतं आहे. काही फेसबुक यूझर्सना ते या प्रोफाईलला फॉलो करत असल्याचं दिसतं आहे, तर काही जणांना मेसेंजरमध्ये त्याला मेसेज पाठवल्याचं दिसतं आहे. विशेष म्हणजे आपल्या फ्रेण्ड लिस्टमधील काही लोक त्या व्यक्तीला ओळखत नसतानाही त्याच्या म्युच्युअल फ्रेण्ड्समध्ये दिसत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला ब्लॉक करण्याचा सल्ला दिला जात आहे. म्हणूनच या नावाच्या व्यक्तीचा तुम्हाला मेसेज आला किंवा फ्रेण्ड रिक्वेस्ट आली तर त्याला उत्तर देऊ नका. विशेष म्हणजे या प्रोफाईलच्या नावापुढे ब्ल्यू टिक आहे म्हणजेच ही प्रोफाईल व्हेरिफाईड असल्याचं दिसत असल्यामुळे अनेक जण चक्रावले आहेत. तसंच या व्यक्तीच्या प्रोफाईलमध्ये इजिप्तचा संदर्भ आढळत आहे.
फेसबुकवरील या प्रोफाईलपासून लोकांना सतर्क करण्यासाठी सोशल मीडियावर या मेसेज व्हायरल करण्यात आले आहेत. फेसबुककडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही, मात्र अनेकांनी सावधगिरीचा इशारा म्हणून या प्रोफाईलपासून दूर राहण्यास सांगितलं आहे. म्हणूनच जर तुम्ही या व्यक्तीला ओळखत नसाल तर लगेचच अनफ्रेंड करुन ब्लॉक किंवा रिपोर्ट करा असा सल्ला दिला जातो आहे.