नवी दिल्ली - जगातील कुठल्याही भागातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतून मार्ग काढून सुखरूपपणे बाहेर पडणाऱ्या बेअर ग्रिल्सचा हा शो अनेकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय आहे. दरम्यान, बेअर ग्रिल्सच्या या शोमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगल सफारी करताना दिसणार आहेत. खुद्द बेअर ग्रिल्स यानेच ट्विट करून ही माहिती दिली होती. मॅन व्हर्सेस वाईल्डचा हा विशेष भाग 12 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बेअर ग्रिल्सने एएनआय या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली. यामध्ये बेअर ग्रिल्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
'घनदाट जंगलात, अत्यंत खडतर परिस्थितीतही मोदी सहजपणे फिरत होते, त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य थोडंही कमी झालं नाही' असं ग्रिल्सने म्हटलं आहे. मोदींची कोणती गोष्ट तुमच्या कायम लक्षात राहील असा प्रश्न ग्रिल्सला विचारण्यात आला. त्यावर 'पावसातही मोदींच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम होते. ते खूप शांत आणि संयमी आहेत. संततधार पावसात जेव्हा सीक्रेट सर्व्हिसने त्यांच्यासाठी छत्री काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मी ठीक आहे असं म्हटलं आणि माझ्यासोबत ते नदीच्या दिशेने चालू लागले' असं ग्रिल्सने म्हटलं आहे.
'आम्हाला नदी पार करायची होती, मी माझ्या हातांनी एक राफ्ट तयार केली. पंतप्रधानांना असं घेऊन जाता येणार नाही, यात धोका आहे असं सीक्रेट सर्व्हिसने सांगितलं. मात्र त्यानंतर मोदींनी त्यांना समजावले. आम्ही राफ्टवर असताना ती बुडू लागली. मी खाली उतरलो आणि राफ्ट खेचू लागलो. तेव्हाही मोदी खूपच शांत होते.' असं देखील बेअर ग्रिल्सने म्हटलं आहे.
मोदींसारखे जागतिक पातळीवरील नेते कठीण परिस्थितीतही शांत आणि संयमी राहतात. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये हे शूटिंग झालं आहे. असे अनेक प्रसंग आले जेव्हा टीमला धोका वाटत होता, पण मोदी तेव्हाही विचलित झाले नाहीत असं ग्रिल्सने म्हटलं आहे.
बेअर ग्रिल्स यांनी या कार्यक्रमाचा टिझर प्रसारित केला होता. 180 देशातील लोकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची कधी समोर न आलेली बाजू पाहण्याची संधी मिळणार आहे. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी नरेंद्र मोदी हे भारतातील जंगलांमध्ये सफारी करताना दिसणार आहेत असं त्याने म्हटलं होतं.
डिस्कव्हरी चॅनेलवर हा विशेष कार्यक्रम 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. दरम्यान, बेअर ग्रिल्सच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या कार्यक्रमात आतापर्यंत जगभरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. बेअर ग्रिल्स आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला होता.