नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमधीलमेट्रो रेल्वेने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये दिल्लीमधील मेट्रोचे जाळे मोठे होत चालले आहे. त्यातच नव्या मार्गांचे बांधकामही सुरु झाले आहे. मात्र तरिही मेट्रोच्या वक्तशीरपणामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. 2003 पासून 2018 च्या मे महिन्यापर्यंत दिल्ली मेट्रो 99 टक्के वक्तशीर असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.साठ सेकंदांपेक्षा एखाद्या फेरीला उशीर झाल्यास तिची नोंद घेतली जाते. 2014 साली 18.59 लाख फेऱ्या झाल्या त्यामध्ये 1,213 फेऱ्यांना उशिर झाला. 2015 साली 19.41 लाख फेऱ्या झाल्या, त्यातील 1115 फेऱ्या उशिराने धावल्या. 2016 साली 21.01 लाख फेऱ्यांपैकी 1326 फेऱ्यांना उशिर झाला तर 2018च्या मे महिन्यापर्यंत 99.86 टक्के फेऱ्या वेळेवर धावल्या. दिल्ली मेट्रोने आपले कार्यक्षेत्र वाढवले असून त्यावरील फेऱ्याही वाढल्या आहेत. तरिही मेट्रोच्या फेऱ्या वेळेवर होत आहेत.वेळापत्रकाप्रमाणे दिल्ली मेट्रोरेल कार्पोरेशन किती फेऱ्या रद्द झाल्याचे याचीही नोंद ठेवते. 2018 च्या मे महिन्यापर्यंत 377 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 2013 साली 709 फेऱ्या, 2014मध्ये 536 फेऱ्या, 2015 साली 1084 फेऱ्या, 2016 साली 692 तर 2017 साली 783 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ब्लू लाइन आणि यलो लाइनवर सरासरी दोन मिनिटे 40 सेकंदांनी एक ट्रेन धावते तर रेड़ लाइनवर तीन मिनिटे 6 सेकंदांनी एक मेट्रो धावते.