नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा धडधडीत खोटे बोलत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. आता तर काँग्रेसने 'मोदींसारखे अस्खलीत खोटे बोलायला शिका' या टॅगलाईनखाली क्रॅश कोर्सच जाहीर केला आहे. या आशयाचे ट्विट काँग्रेसने केले असून केवळ तीन स्टेपमध्येच भारतातील सर्वात मोठा खोटारडा कसे बनता येईल याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काँग्रेसने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्या भाषणाचे व्हिडिओ वापरण्यात आले आहेत. हा व्हिडिओ 3.20 मिनिटांचा असून मोदींसारखे खोटे कसे बोलाल, असा क्रॅश कोर्स असल्याचे म्हटले आहे. पहिल्या स्टेपमध्ये आरशासमोर उभे राहण्यास सांगितले आहे. यानंतर मोदी खोटे कसे बोलतात याचा व्हिडिओ दाखविण्यात आले आहे.
स्टेप 2 मध्ये 15-20 लाख रुपये कसे मिळतील आणि पुढे अमित शहा या निकडणूक जुमला होता असे सांगताना दिसत आहेत. या कोलांटउड्या कशा माराव्यात याबातही मार्गदर्शन करण्यात आले आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये लोकांना आपलेसे करण्यासाठी काय साद घालावी, भाईयो और बहनो...अशी टपलीही हाणण्यात आली आहे.
एवढ्यावरच क्रॅश कोर्स संपत नसून शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदीच तुम्हाला खोटे कसे बोलावे याचे मार्गदर्शन करणार आहेत असे सांगत खोटे बोला पण रेटून बोला असे सांगतानाचा व्हिडिओ जोडण्यात आला आहे. यामध्ये ‘नेहमी खोटं बोला, जेवढे बोलता येईल तेवढे खोटं बोला, जिथे आणि जेव्हा जेव्हा बोलता येईल तेव्हा खोटं बोला, कोणत्याही विषयावर बोला पण खोटं बोला, असे सांगतानाचा व्हिडिओ आहे.
अमेठीमध्ये एके 203 रायफल बनविणार असल्याच्या मोदी यांच्या वक्तव्यावरून सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली होती. किती खोटे बोलाल, असा प्रश्न उपस्थित करत 2010 मध्येच अमेठीमध्ये शस्त्रास्त्रे बनविणारी फॅक्टरी सुरु झाल्याचे म्हटले होते. तेथे छोटी छोटी शस्त्रेही बनत असल्याचे म्हटले होते. यावरून वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना एका वृत्तपत्राच्या बातम्यांच्या लिंक शेअर करत प्रत्यूत्तर दिले होते. आता मोदी यांच्या या व्हिडिओला भाजपा कसे उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 28,400 लोकांनी पाहिला असून #ModiLies असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.