नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गाक्रमण करत आहे. या प्रवासादरम्यान चांद्रयान-2 ने पृथ्वीची काही नयनरम्य छायाचित्रे काढली असून, इस्रोने ट्विटरवरून ही छायाचित्रे शेअर केली आहेत. अंतराळातून आपली पृथ्वी कशी दिसते याचे सुंदर चित्रण चांद्रयान-2 नेया छायाचित्रांच्या माध्यमातून केले आहे.
देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचे चांद्रयान-2 22 जुलै रोजी दुपारी चंद्राच्या दिशेने झेपावले होते. आता हे यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्राच्या जवळ पोहोचणार असून, या यानामधील विक्रम हा लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार आहे.
चांद्रयान-2 चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर विक्रम हा लँडर मुख्य यानापासून वेगळा होऊन चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने जाईल. हा लँडर चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरेल. तर ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत 100 किमी अंतरावरून चंद्राभोवती घिरट्या घालत राहील.