महात्मा गांधींमुळे पकडला गेला लैंगिक शोषणातील आरोपी, झाली अशी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 02:45 PM2023-10-12T14:45:11+5:302023-10-12T14:45:36+5:30
Kerala Crime News: सत्याच्या मार्गावर चालण्याची महात्मा गांधी यांची शिकवण साडे तीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाचा तपास करण्यामध्ये आणि आरोपीला १०० वर्षांची शिक्षा सुनावण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरली.
सत्याच्या मार्गावर चालण्याची महात्मा गांधी यांची शिकवण साडे तीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाचा तपास करण्यामध्ये आणि आरोपीला १०० वर्षांची शिक्षा सुनावण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरली. दोन वर्षे जुन्या प्रकरणामध्ये पथनमथिट्टा जिल्ह्यातील अडूर फास्ट ट्रॅक आणि विशेष न्यायालयाने ११ ऑक्टोबर रोजी कोल्लम जिल्ह्यातील पथनपुरमजवळील पुन्नावा येथील आरोपी विनोद याला १०० वर्षांच्या कठोर कारावासाची आणि ४ लाख रुपये शिक्षा सुनावली.
ही भयावह घटना दुसरीच्या पुस्तकातील महात्मा गांधींबाबतच्या एका धड्यामुळे समोर आली. पीडित मुलीच्या आठ वर्षीय बहिणीने तिच्या धाकट्या बहिणीचं लैंगिक शोषण झाल्याबाबत तिच्या आईला सांगितले आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. महात्मा गांधींच्या कधी कुणाशी खोटं बोलू नये, शिकवणीवर आधारित धड्याचा या मुलीच्या मनावर सकारात्मक प्रभाव पडलेला होता. त्यानंतर तिने आईला सगळं खरंखरं सांगायचं ठरवलं. ही धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर आई-वडिलांनी अडूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.
साडे तीन वर्षांच्या या मुलीवर १८ डिसेंबर २०२१ रोजी अत्याचार झाले होते. आरोपीने पीडित मुलीच्या ८ वर्षीय बहिणीसोबतही गैरवर्तन केले होते. ती या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवून पाच कलमांखाली निकाल सुनावला. आरोपीला १०० वर्षांची शिक्षा पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी देण्यात आली आहे. त्यात दोषी आरोपीला अल्पवयीनांच्या केलेल्या शोषणाच्या आरोपासाठी किमान २० वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच आरोपीला ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम पीडित मुलींना दिली जाईल. तसेच दंड न भरल्यास आरोपीला दोन वर्षांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल.
ही शिक्षा पॉक्सो कायद्यातील विविध कलमांखाली सुनावण्यात आली आहे. यामध्ये पॉक्सो कायदा कलम ४ (२) आणि ३ (ए) अन्वये २० वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड आणि पॉक्सो ४ (२) आणि ३ (डी) अन्वये २० वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड यांचा समावेश आहे. त्याशिवाय पॉक्सो ६ आणि ५(I) अन्वये २० वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपये, पॉक्सो ६ आणि ५ (20 वर्षे आणि १ लाख रुपये) अंतर्गत १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.