लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना काळात ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांना मोबाइलचे लागलेले व्यसन धोकादायक ठरत आहे. याचा परिणाम म्हणजे आता मुलांना शिक्षक जे शिकवतात त्यावर तसेच विषय समजून घेताना त्यावर लक्ष केंद्रित करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुलांना गोष्टी आठवतात पण ३० शब्दही लिहिणे कठीण जात असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.
अनेक लहान मुले अशी आहेत ती अतिशय उत्तम विचार व्यक्त करतात, पण ते त्या गोष्टी मांडू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण तर वाढत आहेच शिवाय त्यांना परीक्षेत चांगले मार्कही मिळत नाहीत. बहुतांश मुलं मोबाइलमध्ये बोलून गोष्टी शोधतात, यामुळे ते लिहिण्यापासूनही दूर जात असल्याचे समोर आले आहे.
पाच ते आठ वर्षांच्या मुलांना केवळ दहा ते तीस शब्दांची उत्तरे लिहिण्यात अडचण येत आहे. गणित सोडवणे, इंग्रजी लेखन आणि हिंदी या विषयात त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. हे त्यांच्या हातात मोबाइल दिल्यामुळे झाल्याचे परिणाम आहेत. मुले फक्त सरावानेच स्पष्ट, चांगले लिहायला शिकतात. जितका सराव जास्त तितके लेखन चांगले होईल,असे मत बरखा जैन या शिक्षिकेने व्यक्त केले.
मुले लिहिताना बोटात दुखत असल्याची तक्रार करीत आहेत. जास्त कीबोर्ड वापरल्याने किंवा चार ते पाच पाने लिहिल्याने त्यांचे हात दुखायला लागतात. पेन वा पेन्सिल खूप घट्ट धरल्यानेही नसांमध्ये तणाव निर्माण होतो. सरावाने सर्वकाही हळूहळू बरोबर होते. - डॉ. रजत भार्गव, फिजिओथेरपिस्ट
केस १ : कुनिका (वय ८)
चौथीत शिकते. सर्व विषयांची उत्तरे तोंडपाठ आहेत. तरीही तिला परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. पालकांनी उत्तरपत्रिका पाहिली असता अनेकांची उत्तरे तिने बरोबर लिहिलेली नसल्याचे लक्षात आले. हस्ताक्षर देखील खूप खराब होते जे वाचणे कठीण होते.
केस २ : आस्था (१२)
हिला बऱ्याच गोष्टी आठवतात. लिहिताना बोटात ताण आल्याने लिहिणे कमी होऊ लागले. याला कार्पल टनल सिंड्रोम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अल्ट्रासाऊंड आणि टेन्सने तपासल्यानंतर तो औषधांनी बरा झाला.
पालकांनी काय करायला हवे?
n मुलांना पत्र लिहिण्यास किंवा कथा लिहिण्यास सांगा.n एखाद्या ठिकाणाचा वा गोष्टीचा अनुभव लिहून दाखवा.n कविता व कथा लिहायला लावा.n मुलांना एखाद्या विषयाबद्दल काय वाटते ते लिहा.n लिहिण्यास सोयीस्कर पेन आणि पेन्सिल द्या.