कल्याण : विकासाचा आराखडा देऊ शकत नाही म्हणून आरक्षणाची खिरापत वाटण्याचे काम सध्या सरकारकडून सुरू आहे. परंतु आरक्षणाच्या नावाने दुफळी माजवण्याचे काम भाजपा सरकार करीत असून, त्यामुळे जाती,जातींमध्ये संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कल्याणमध्ये रविवारी व्यक्त केली. येथील एपीएमसी ग्राउंडवर वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा झाली. आंबेडकर यांनी भाजपा-शिवसेना सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, आ. वारिस पठाण उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, भाजपाने संविधानाच्या माध्यमातून केंद्रात सत्ता मिळवली. जोपर्यंत बहुमत नव्हते तोपर्यंत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहकाराची भाषा होती. परंतु २०१४ मध्ये बहुमत मिळताच त्यांनी खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली. याच आरएसएसने १५ आॅगस्ट हा काळा दिवस साजरा केला आहे. तिरंग्याला न मानणाऱ्यांनी २०१४ ला नाक मुठीत धरून नागपूर रेशमबागेत पहिल्यांदा तिरंगा फडकवला. ज्यांनी देशाचा तिरंगा मानला नाही, त्यांच्यावर अद्याप का कारवाई झाली नाही? आजही काँग्रेस याचे उत्तरदेत नाही. आरएसएस ही देशातील एक आतंकवादी संघटना आहे. आरएसएस प्रमुख शस्त्रांची पुजा करतात. देशात पोलीस, लष्कर सक्षम असताना शस्त्रांची गरज काय? आरएसएस ही एका विशिष्ठ समाजाची संघटना असली तरी त्यांच्यासोबत संपूर्ण समाज नाही, ही चांगली गोष्ट आहे. अमेरिका, युरोपमध्ये गेलेले बुद्धीजीवी आरएसएसभक्त आहेत. मग आरएसएसने सांस्कृतिक राष्ट्रवाद काय असतो, तो समजावून सांगावा. आम्ही या देशातील संवैधानिक आणि भौगोलिक राष्ट्रवाद सांगतो. आमचे आव्हान स्वीकारा. पण ते कधीही आव्हान स्वीकारणार नाही. कारण यांचा राष्ट्रवाद म्हणजे मनुवाद आहे. आरएसएसची संस्कृती द्वेषाची आणि एकमेकांना समान न बघणारी आहे, असेही ते म्हणाले.सर्वांनी एकत्र या : असदुद्दीन ओवैसीनरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस न्याय देतील या भ्रमात राहू नका. ७९ वर्षे ज्यांनी आपल्याला रडविले, त्यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ओवैसी म्हणाले. २८० जागा मिळवूनही पंतप्रधान रोहित वेमुलाचा मृत्यू रोखू शकले नसल्याची टीका त्यांनी केली.
आरक्षणाच्या खिरापतींमुळे जातीय संघर्ष अटळ- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 6:24 AM