नवी दिल्ली- स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करताना त्यांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे एकतेने नांदत होते. तसेच आपसातील सर्व जातीधर्माचे भेदभाव विसरून दलित मराठ्यांसह बहुजनांनी शिवरायांचे मावळे होण्याचा संकल्प करा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले .आज शिवजन्मोत्सव सोहळा देशभरात मोठ्या दिमाखात साजरा होत असून दिल्लीतही मोठ्या उत्साहात साजरा झाला.भव्य दिव्य पुतळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी अभिवादन केले. याप्रसंगी पारंपरिक वेशभूषेत वस्त्र परिधान करून महाराष्ट्रातील मराठी समुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. विशेष करून अभिवादन रॅलीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करून आदर्श राजा' शिवरायांची शिवशाही आजही सर्व भारतीयांना हवी आहे.शिवाजी महाराजांना सारखे शूर आणि महान व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र भूमीत जन्मले याचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रनिर्माणाची मुहूर्तमेढ शिवाजी महाराजांनी जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीच रोवली होती. शिवाजी महाराज आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले आहेत, अशा शब्दांत छत्रपती शिवरायांचा गौरव ना. रामदास आठवलेंनी आपल्या भाषणात यावेळी केला.
जाती-धर्मभेद विसरून छत्रपती शिवरायांचे मावळे व्हा- रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 6:39 PM