नवी दिल्ली - सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते ती म्हणजे रेल्वे, भारतात रेल्वेचे खूप मोठे जाळे आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात कोट्यवधी लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. मोजक्या तिकीट दरात इच्छित स्थळी लोकांना पोहचता येते. परंतु याच रेल्वे प्रवासात काही महाभाग विनातिकीट प्रवास करत असतात.
मागील काळात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात मोहिम आखली होती. याच मोहिमेत दक्षिण रेल्वेमधील मुख्य तिकीट निरिक्षक रोसालिन अरोकिया मॅरी(Rosaline Akrokia Mary) यांनी केलेल्या कामगिरीमुळे सध्या देशभरात त्या चर्चेत आल्या आहेत. मॅरी यांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल १.०३ कोटी रुपये वसूल केले आहे. या महिला टीसीच्या कामगिरीमुळे रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
रेल्वेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, आपल्या कर्तव्यांसाठी कटिबद्धता दाखवत जीएमएस रेल्वेच्या मुख्य तिकीट निरिक्षक श्रीमती रोसालिन अरोकिया मॅरी या भारतीय रेल्वे तिकीट कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या महिला बनल्या आहेत ज्यांनी अनियमित आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून १.०३ कोटी रुपयांची दंड वसुली केली आहे.
इतक्या मोठ्य़ा प्रमाणात दंड वसूली करणारी पहिली महिला टीसी म्हणून रोसिलिन अरोकिया मॅरी यांचे रेल्वेच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ट्विटरवर अनेक नेटिझन्सही त्यांच्या कामाचे कौतुक करतायेत. अभिनंदन, तुम्ही खूप चांगले काम केले. विनातिकीट प्रवाशांना दंड व्हायलाच हवा अशा शब्दात नेटिझन्स मॅरी यांच्यावर कामावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी वाहतूक सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. मुंबई तर मोठ्या प्रमाणात चाकरमानी रेल्वेने प्रवास करत असतात. दिवसाला लाखो लोक ट्रेनने ये-जा करत असतात.