लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत बीएड (बॅचलर ऑफ एज्युकेशन) पदवीधारक उमेदवार प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी अपात्र आहेत, असा निर्णय दिला आहे. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आलेल्या या निकालाचा बीएड आणि बीटीसीद्वारे अध्यापनाच्या क्षेत्रात जाणाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बीएडवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, बीएड पात्र उमेदवार देशभरातील पीआरटी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत.
नेमके प्रकरण काय?
- २०१८ मध्ये राष्ट्रीय शिक्षकशिक्षण परिषदेने (एनसीटीई) जारी केलेल्या अधिसूचनेवरून वाद निर्माण झाला. या अधिसूचनेमध्ये बीएड पदवी असलेल्या उमेदवारांना राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (आरईईटी) अर्ज करण्यास पात्र मानले जाईल अशी तरतूद करण्यात आली होती.- त्यापूर्वी, फक्त बीटीसी-पात्र उमेदवारच पीआरटी पदांसाठी अर्ज करू शकत होते. या अधिसूचनेला विरोध झाला.